Dehuroad : उबेर कॅब चालकाला मारहाण करून मोबाईल, रोकडसह कार पळवली; अनोखी चार जणांविरोधात गुन्हा
एमपीसी न्यूज – उबेर कॅब चालवणा-या चालकाला भर रस्त्यात अडवून मारहाण करून कार, मोबाईल फोन आणि रोकड चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 13) पहाटे तीनच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावर देहूगाव कमानीजवळ घडली.
शाहरुख आलम शेख (वय 25, रा. आदर्श इंद्रानगर, आळंदी रोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोखी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख उबेर कॅब चालक आहेत. त्यांनी बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास प्रवाशांना सोडले. त्यानंतर ते जुना पुणे-मुंबई महामार्गावरून निगडीच्या दिशेने येत असताना देहूगाव कमानीजवळ त्यांच्या कारला एका कारचालकाने कार आडवी लावली. कारमधून उतरलेल्या दोघांनी शेख यांना मारहाण केली. जडवस्तू डोक्यात मारून शेख यांना जखमी केले.
जबरदस्तीने शेख यांच्याकडून एम एच 13 / एन एक्स 1755 ही वॅगनआर कार, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख आठ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.