Pimpri : प्रेमात अडथळा ठरत असल्याने पत्नीने लष्करी सेवेतील पतीचा विष देऊन काढला काटा

पत्नी, प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – प्रेमात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने लष्करी सेवेत असलेल्या पतीचा विष देऊन काटा काढला. सोडिअम साइनाइडची गोळी पाण्यात देऊन पतीचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मोटारीत घालून तो राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकला. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी रहाटणी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर, प्रियकाराच्या मित्रांना अटक केली आहे.

संजय पांडुरंग भोसले (वय 38, रा. रहाटणी) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. संजय हे भारतीय लष्करात कार्यरत होते. याप्रकरणी संजय यांची पत्नी शीतल भोसले (वय 29), तिचा प्रियकर योगेश कमलाकर कदम (वय 29, रा. रहाटणी), त्याचे मित्र मनीष नारायण मदने (वय 32, रा. काळेवाडी) आणि राहुल अशोक काळे (वय 35, रा. काळेवाडी) या चार जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. कदम यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संजय आणि शीतल यांना दहा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी आहे. संजय हे लष्कर सेवेत आसाम येथे कार्यरत होते. त्यामुळे ते काही महिन्यांनी घरी येत असत. आरोपी शीतल आणि तिचा प्रियकर योगेश कदम यांच्यात प्रेमसंबंध होते. योगेश हा त्यांच्या घरासमोरच राहत होता. संजय यांना शीतल आणि योगेश यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाल्याने पती-पत्नीमध्ये भांडण होऊ लागली.

त्यामुळे शीतल आणि योगेश या दोघांनी संजय यांचा काटा काढण्याचे ठरवले. संजय सुट्टीनिमित्त आले घरी आले होते. आरोपी पत्नी शीतल हिने 7 नोव्हेंबर रोजी पाण्यात सोडीयम साईनाईडची गोळी टाकून संजय यांना पिण्यास दिली. विषबाधा झाल्याने संजय यांचा जागीच मृत्यू झाला.

पुरावा नष्ट करण्यासाठी शीतलचा प्रियकर योगेश, त्याचा मित्र मनिष या तिघांनी झुम कारने (एम.एच 12 क्यू जी 4269) संजय यांचा मृतदेह खेड शिवापूर येथे टाकून दिला. रायगड पोलिसांना संजय यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी संजय यांच्या खिशातील मोबाईलवरुन पत्नी शीतल हिच्याशी संपर्क साधला. तिच्याकडे कसून चौकशी केली असता प्रियकराच्या मदतीने आपणच पतीचा खून केल्याची कबुली तिने दिली. त्यानंतर पोलिसांनी शीतल, प्रियकर योगेश त्याच्या मित्रांना अटक केली आहे. वाकड ठाण्याचे फौजदार सिद्धार्थ बाबर तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.