Pimpri : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हा शिवसेनेसाठी ऐतिहासिक क्षण!  शिवसैनिकांची भावना

एमपीसी न्यूज – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवारी) राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तब्बल 20 वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्री झाली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड आनंद, जोष, उत्साह निर्माण झाला असून आमच्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याच्या प्रतिक्रिया शहरातील शिवसेनेच्या नेत्यांनी दिल्या आहेत.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”शिवसेना पक्षप्रमुख, आमचे नेते उद्धव ठाकरे हे ठाकरे परिवारातील सदस्य पहिल्यांदा राज्याचा मुख्यमंत्री होत आहे. एक शिवसैनिक म्हणून आज सर्वोच्च आनंद झाला आहे. उद्धवजी यांनी राज्यभरात दौरे केले. शेतकरी, कामगारांचे दु:ख जाणले आहे. हा नेता आता राज्याचे मुख्यमंत्री होत आहे. राज्यातील जनतेला, बळीराजाला, सामान्य जनतेला न्याय मिळेल”.

”हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना आणि नंतरही उद्धव साहेब यांनी खूप संघर्ष केला आहे. त्यांच्या माध्यमातून जनतेला न्याय देणारा मुख्यमंत्री राज्याला मिळाला आहे. विरोधक जाणीवपूर्वक काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याची टीका करतात. परंतु, त्यांच्यासोबत जाण्याचा प्रसंग भाजपनेच आणला आहे. उद्धव साहेब पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील. मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेब आदर्शवत काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला”.

शिवसेनेच्या शिरुर जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे म्हणाल्या, ”शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे आणि स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे हा चौपट आनंद आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा आनंद गगनात मावत नाही. प्रत्येक शिवसैनिक आनंदीत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे सच्ची शिवसैनिक म्हणून मनाला समाधान आहे. तीन पक्षांचे सरकार असले. तरी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा उद्धवजी यांचा स्वभाव आहे. दुस-याचे ऐकूण घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्यासोबत अनुभवी लोक आहेत. शरद पवार साहेबांचे मार्गदर्शन असणार आहे. त्यामुळे कष्टकारी, शेतकरी, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार आहे. त्यामुळे सर्व समाधानी आहोत”.

शिवसेनेचे भोसरी, खेडचे सहसंपर्कप्रमुख, कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले, “20 वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. ठाकरे घराण्यातील आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले आहेत.  हा शिवसैनिकांसाठी ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड आनंद, जोष, उत्साह आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री झाले आहेत.  या सरकारच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, माथाडी कामागारांना दिलास मिळणार आहे”

शहरप्रमुख योगेश बाबर म्हणाले, “शिवसैनिकांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे. ठाकरे परिवारातील मुख्यमंत्री झाल्यामुळे शिवसैनिकांसाठी ऐतिहासिक क्षण आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण झाला आहे. शिवसैनिकांचे स्वप्न होते. ते पक्षप्रमुखांनी करुन दाखविले आहे. या सरकारच्या माध्यमातून शेतकरी, तरुणांचे प्रश्न मार्गी लागतील. महाराष्ट्रासमोर अनेक आव्हाने आहेत. या सरकारच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यात येतील. एक अग्रक्रमी राज्य म्हणून महाराष्ट्राची वाटचाल होईल”

महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, “‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न उद्धव साहेबांनी पूर्ण केले आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांना मोठा आनंद झाला आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन उद्धवसाहेब काम करतील. सर्वांना न्याय देतील. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्न उद्धव साहेबांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत”

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके म्हणाले, “करोडो शिवसैनिकांसाठी आजचा दिवस सुवर्ण दिवस आहे. शिवसैनिक हा दिवस कधीच विसरणार नाहीत. सुवर्ण अक्षराने या दिवसाची नोंद केली जाईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.