National Update : देशात कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 933; बळींचा आकडा 392

एमपीसी न्यूज – देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1,118 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 933 वर जाऊन पोहचली आहे. एकूण मृतांचा आकडा 392 वर पोहचला असून, गेल्या 24 तासात 39 जण दगावले आहेत. तर आत्तापर्यंत 1344 रुग्ण या आजारातून बरे झाले असते, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिल्ली येथील पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रात 117 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्यामुळे महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या आता 2,801 झाली आहे. राजस्थान 41, उत्तर प्रदेश 75, गुजरात 45, आंध्र प्रदेश 18, पश्चिम बंगाल 23 या राज्यांमध्ये जास्त रुग्ण संख्यांची गेल्या 24 तासात नोंद झाली आहे.

दरम्यान, दिल्ली येथील पत्रकार परिषदेत अगरवाल म्हणाले, कॅबिनेट सचिवांनी आज राज्य सरकारसोबत चर्चा केली आहे. यामध्ये हॉटस्पॉट, कंटेन्मेंट झोनबाबत आढावा घेण्यात आला. या अंतर्गत जिल्ह्यांचे हॉटस्पॉट जिल्हे, नॉन हॉटस्पॉट आणि ग्रीन झोन असे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाणार आहे.

देशात 170 जिल्हे कोरोना हॉटस्पॉट असून देशात अद्याप कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला नाही, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. तसेच कोरोनाची सौम्य लक्षण असणाऱ्यांसाठी कोविड सेंटर आणि गंभीर रुग्णांसाठी कोविड रुग्णालय असणार आहे. गृहमंत्रालयाकडून जी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे, तिचा योग्य अवलंब करणे महत्त्वाचे आहे.

वटवाघुळामध्ये ही कोरोनाचा विषाणू असू शकतो. चीनमध्ये केलेल्या संशोधनानुसार, कोरोना विषाणू वटवाघुळामधून आला असेल किंवा पेंगुलीन नावाच्या जनवरातून माणसांमध्ये आला असेल, अशी माहिती यावेळी आयसीएमआर च्या प्रवक्त्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.