Pune Lockdown Crime: घरभाड्याच्या पैशांसाठी भाडेकरूकडे तगादा; घर मालकिणीवर गुन्हा

corona updates Offense against a landlord who demand rent to tenant in lockdown period in pune

एमपीसी न्यूज- एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात राहणाऱ्या चंद्रपूर येथील तरुणीकडे घरमालकिणीने लॉकडाऊनच्या काळात घरभाड्यासाठी तगादा लावला. तसेच भाडे द्यायला विलंब होत असल्याने काही कारणे सांगून तरुणीला रूम खाली करण्यास सांगितले. यामुळे संबंधित तरुणीने पोलिसात धाव घेत घरमालकिणीच्या विरोधात तक्रार दिली आहे.

मेघा बोथरा या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार श्रेया लिमण (रा.नवी पेठ, पुणे) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे सर्व बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने व एकूणच सर्व आर्थिक व्यवसायिक गतिविधी बंद झाल्या आहेत.

यामुळे सर्वसामान्य जनतेच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे.

या अभूतपूर्व परिस्थितीमुळे सर्वसामान्य जनतेला साथीच्या रोगाच्या समस्येबरोबरच आर्थिक अडचणींना देखील तोंड द्यावे लागत आहे.

लॉकडाउनच्या कालावधीत बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही घरमालकाने भाडेकरूकडून सक्तीने घर भाडे वसूल करू नये. किमान 3 महिने घर भाड्याची वसुली पुढे ढकलावी, अशा लेखी सूचनांचे आदेश जाहीर केले आहेत.

पुणे पोलीस आयुक्तांनी या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून भाडेकरूंना कोणताही त्रास होऊ नये, याच्या पोलिसांना सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, मेघा बोथरा यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली होती.

बोथरा या चंद्रपूर येथून पुण्यात एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी आल्या आहेत. त्या पुण्यातील नवी पेठ परिसरात श्रेया लिमण यांच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहत होत्या.

दरमहा एक हजार 700 रुपये भाडे ठरलेले होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात बोथरा भाडे देऊ शकल्या नाहीत.

त्यामुळे घर मालकीण लिमण यांनी बोथरा यांच्याकडे वारंवार भाड्यासाठी तगादा लावला. घरभाडे दे नाहीतर रूम खाली कर, अशी वारंवार धमकी दिली.

बोथरा सध्याच्या परिस्थितीत घरभाडे देऊ शकत नसल्याने लिमण यांनी ‘माझे घर दुरुस्त करायचे आहे’, असा बहाणा करून बोथरा यांना घर खाली करण्यास भाग पाडले.

याबाबत बोथरा यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवली. घर मालकिण लिमण यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188, 506(1), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51(ब), साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम 2,3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.