Pimpri News: उद्योग क्षेत्र ‘व्हेंटिलेटर’वर, केवळ 20 टक्के ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या निर्णयामुळे फटका

गंभीर रुग्णावर उपचार करताना पुरेशा प्रमाणात व वेळेत ऑक्सिजन मिळणे गरजेचे आहेच. परंतु, त्यासाठी उद्योग क्षेत्राचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय चुकीचा आहे.

एमपीसी न्यूज – उद्योग क्षेत्राला केवळ 20 टक्के ऑक्सिजन देण्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्णयामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. अगोदरच आर्थिक मंदी, लॉकडाऊनमुळे उद्योग क्षेत्र अडचणींचा सामना करत आहे. त्यात हा निर्णय घेतल्याने उद्योग क्षेत्र व्हेंटिलेटरवर जाईल. त्यामुळे उद्योग क्षेत्राला ऑक्सिजन सिलिंडर पूर्वीच्या दरात व प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 7 सप्टेंबरच्या आदेशानुसार ऑक्सिजन उत्पादकांनी 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी आणि 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक उत्पादनासाठी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

पुणे जिल्हात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, अशा परिस्थितीमध्ये रुग्णालयाकडून ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. गंभीर रुग्णावर उपचार करताना पुरेशा प्रमाणात व वेळेत ऑक्सिजन मिळणे गरजेचे आहेच. परंतु, त्यासाठी उद्योग क्षेत्राचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय चुकीचा आहे.

फॅब्रिकेशन, प्लाझ्मा कटिंग ऑटो पार्ट, रबर, प्लास्टिक सारख्या उद्योगासाठी मोठ्याप्रमाणात ऑक्सिजन लागतो. एका दिवसांत उत्पादकांनी व वितरकांनी दरवाढ केली आहे. पूर्वी 20 रुपये घन मीटर असलेला दर एका दिवसांत 28 रुपये घन मीटर झाला आहे. एवढे दर देऊन ही ऑक्सिजन सिलिंडरचा मोठा तुटवडा एका दिवसांत निर्माण केला गेला आहे. मोठ्याप्रमाणात काळा बाजार चालू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

कोरोना संकट, लॉकडाऊन मधून अजून उद्योग क्षेत्र अद्याप सावरले नाही. उद्योगात अनेक कामात ऑक्सिजन सिलिंडरची मोठी गरज असते. या उद्योगावर अनेक उद्योजक व कामगार यांचा चरितार्थ अवलंबून आहे. ऑक्सिजन सिलिंडरचे उत्पादन वाढवून दर कमी करून होणारा संभाव्य काळा बाजार थांबवावा. तसेच उद्योग क्षेत्राला ऑक्सिजन सिलेंडर पूर्वीच्या दरात व प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी संदीप बेलसरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.