Pune Crime News : शाळेतील पाण्याची टाकी साफ करताना विजेचा धक्का लागून कर्मचार्याचा मृत्यू
एमपीसीन्यूज : शाळेची पिण्याच्या पाण्याची टाकी साफ करताना सदोष विद्युत पंपामुळे विजेचा धक्का बसून सफाई कामगार तरूण ठार झाला. ही घटना 31 नोव्हेंबरला आंबेगाव पठारमधील केम्ब्रिज शाळेमध्ये घडली.
याप्रकरणी शाळेच्या संचालकासह पदाधिकारी आणि कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव पायाळ (वय 38, रा. अपर, इंदिरानगर) असे ठार झालेल्या सफाई कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी संचालक चंद्रकांत कुंजीर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कंत्राटदार किशोर मोरे यांच्याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा महादेव पायाळ (वय 33) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव 31 नोव्हेंबरला आंबेगाव पठार परिसरातील केम्ब्रिज शाळेतील पाण्याची टाकी साफ करीत होते. त्यावेळी विद्युत पंपातील विजेचा धक्का बसल्यामुळे महादेव यांचा जागीच मृत्यू झाला.
विद्युत मोटारपंप सदोष असतानाही कोणतीही उपाययोजना न करता हलगर्जीपणा केल्यामुळे महादेवचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार शाळेचे संचालक चंद्रकांत कुंजीर यांच्यासह ठेकेदार किशोर मोरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत आहेत.