Wakad News : महिलेची सहा लाख 80 हजारांची फसवणूक व्यावसायिकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जमिनीच्या व्यवहारासाठी तसेच ज्वेलर्सकडे तारण ठेवलेले सोने सोडविण्यासाठी महिलेकडून सहा लाख 80 हजार रुपये घेतले. ते पैसे परत न करता एका व्यावसायिकाने महिलेची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डिसेंबर 2019 पासून 19 मे 2021 या कालावधीत वाकड येथे घडली.

रावसाहेब माणिक डोंगरे (वय 36, रा. सुदर्शन कॉलनी,  वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत राखी दीनबंधू पोद्दार (वय 42, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डोंगरे हा व्यावसायिक आहे. त्याने फिर्यादी यांच्याकडून उमेश इटकर यांच्या चांदखेड येथील दोन गुंठे जमिनीच्या व्यवहारासाठी ऑनलाईन पंचवीस हजार, रोख स्वरूपात 90 हजार रुपये घेतले. ते पैसे परत केले नाहीत.

तसेच आंधळे गाव येथील एकवीस गुंठे जमिनीच्या व्यवहारासाठी पाच लाख वीस हजार रुपये घेतले. त्यातील अर्धे पैसे दोन लाख साठ हजार रुपये आरोपीने देणे अपेक्षित होते. परंतु त्याने ती रक्कम फिर्यादी यांना दिली नाही.

आरोपी डोंगरे आणि त्याच्या पत्नीला त्यांचे पंचम ज्वेलर्सकडे तारण ठेवलेले सोने सोडविण्यासाठी एक लाख पाच हजार रुपये दिले. तसेच आंधळे गाव येथील सुरेखा कलाटे यांच्या 18 गुंठे जमिनीच्या व्यवहारासाठी दिलेले दोन लाख रुपये आरोपीने अप्रामाणिकपणे स्वतःकडे ठेवून घेतले.

एकूण सहा लाख 80 हजार रुपये   फिर्यादी यांच्याकडून घेऊन आरोपी डोंगरे याने फिर्यादी यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.