Wakad News: वाकडमधील नगरसेवकांना आव्हान; फलक झळकावत राजकीय रणधुमाळीला सुरुवात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राजकीय रंग भरायला सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 25 वाकड येथील सार्वजनिक रस्त्यांवर ‘होय मी रस्ता बोलतोय’ अशा आशयाचे फलक झळकले आहेत. आता नागरिकांची एकच मागणी, रस्ता व नगरसेवक नवीन हवा, असा मजकूर त्या फलकांवर लिहिला आहे. हे खर्चिक फलक कोणी आणि कोणत्या राजकीय पक्षाच्या इच्छुकांनी लावले याची मात्र जोरदार चर्चा शहरभर सुरू झाली आहे.

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 25 वाकड-ताथवडे-पुनावळे मधून शिवसेनेचे राहुल कलाटे, रेखा दर्शल, अश्विनी वाघमारे हे तिघे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे निवडून आले. महापालिकेत भाजपची सत्ता आली. गेल्या साडेचार वर्षांत भाजप प्रभाग क्रमांक 25 मधील विकास कामावरून भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना पहायला मिळाला, त्याला विधानसभा निवडणुकीची किनार आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीची प्रभागरचना सुरू झाली आहे. युत्या-आघाड्याच्या चर्चांना वेग आला आहे. स्वबळाची भाषाही वापरली जात आहे. यापार्श्वभूमीवर वाकडमध्ये निनावी झळकलेल्या फलकांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, वाकडमधील दत्त मंदिर रोडवरील विद्युत खांबावर आता नागरिकांची एकच मागणी, रस्ता व नगरसेवक नवीन हवा, होय मी रस्ता बोलतोय असा मजकूर लिहिलेले फलक झळकले आहेत. या फलकांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या निनावी फलकांची वाकड परिसरातील गृहनिर्माण संस्थामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. फेलक्सवारमधून निवडणुकीचे रंग भरायला सुरुवात झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.