Chinchwad News : कविता हा संवेदनशीलतेचा उत्सव – राजन लाखे

एमपीसी न्यूज – “कविता हा संवेदनशीलतेचा उत्सव असतो!” असे भावोत्कट उद्गार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी काढले. राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष चटणे लिखित ‘मृगजळ’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे नुकताच हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर केशव घोळवे, शिक्षण मंडळ सदस्य गजानन चिंचवडे, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, राज अहेरराव, सुरेश कंक, प्रकाशक नितीन हिरवे यांची उपस्थित होते.

राजन लाखे पुढे म्हणाले, ‘कविता हा संवेदना, व्यथा, वेदना, जाण, जाणीव, उत्साह, चेतना, आशा यांचा संवेदनात्मक संगम असतो. लेखक, कवी, साहित्यिक या संगमातील प्रत्येक बाजू आपल्या लेखणीतून व्यक्त करीत असतो.’

याप्रसंगी, कवी सुभाष चटणे म्हणाले, ‘साहित्याने मला जगण्याची एक नवी दिशा दिली ; तसेच आज 39 वर्षांच्या सेवापूर्ती निमित्ताने कुटुंबीय, आप्तेष्ट, साहित्यिक आणि शिक्षकपरिवार यांच्या प्रेमामुळे मनांत कृतार्थपणाची भावना आहे.’ अशी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर राऊत यांनी केले तर अमोल फुंदे यांनी आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.