Wakad News : वाकड परिसरात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या
एमपीसी न्यूज – वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटना कस्पटे वस्ती वाकड आणि आदर्शनगर काळेवाडी येथे रविवारी (दि. 13) उघडकीस आल्या.
पहिल्या घटनेत सनी विजय मंडलिक (वय 34, रा. निसर्ग सिटी, कस्पटे वस्ती, वाकड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सनी यांनी खोली आतून बंद केली. त्यानंतर बेडशीटच्या साहाय्याने सिलिंग फॅनला गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
दुसऱ्या घटनेत शाम अर्जुन ढाकणे (वय 30, रा. आदर्शनगर, काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास शाम यांनी लहान मुलाच्या झोक्याच्या दोरीने गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना जवळच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दोन्ही घटनांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.