Nigdi News : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात आम आदमी पार्टीचे आंदोलन

एमपीसी न्यूज – पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहरच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

निगडीतील लोकमान्य टिळक पुतळ्या जवळ आज (शुक्रवारी) झालेल्या वाढत्या महागाईच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अनुप शर्मा, शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, वहाब शेख, अशोक तनपुरे, डॉ. अमर डोंगरे ,ब्रह्मानंद जाधव,नंदू नारंग,कपिल मोरे,चेतन बेंद्रे, प्रकाश हगवणे,विजय अब्बाड ,चांद मुलाणी,सद्दाम पठाण, स्वप्नील जेवळे, सरोज कदम,चांद मुलाणी,फैझल सय्यद, ओवैस शेख, अरबाज शेख, शिवा बोटे,विशाल जाधव, गणेश करडे, नागेश वाघमोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अनुप शर्मा म्हणाले, “गेल्या एक वर्षात कोरोना महामारीमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योग धंदे बंद पडले, कर्ज वाढले. अशा या संकट समयी राज्य व केंद्र सरकारची प्राथमिकता लोकांना नोकऱ्या मिळवून देणे, उद्योग धंदे पुनर्वसन करण्याचे असले पाहिजे. मात्र सरकार पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून जनतेवर अतिरिक्त भार टाकत आहे. जो पर्यंत पेट्रोल, डिझेल चे दर केंद्र सरकार कमी करत नाही तो पर्यंत आम आदमी पार्टी महागाईच्या विरोधात आंदोलन करत राहणार आहे”.

“मोदी सरकारला सत्तेची मस्ती आहे. त्यामुळे त्यांना सामान्य जनतेचा आवाज ऐकू येत नाही. जनता मेटाकुटीला आलेली आहे. अनेकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. या सर्व गोष्टींना केंद्र सरकार व राज्य सरकार जबाबदार आहे असे” प्रकाश हगवणे म्हणाले.

“आंतरराष्ट्रीय बाजारात कच्यातेलाचे दर कमी होत असताना केंद्र सरकार मात्र पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढवत आहे. महाराष्ट्रात तर पेट्रोल शंभर रुपये लिटर पेक्षा जास्त महाग झाले आहे. त्याचा परिणाम महागाई वाढण्यात होत आहे. याची झळ सामान्य जनतेला बसत आहे. खाद्य तेलाचे दर ही गगनाला भिडले आहेत सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असे” वैजनाथ शिरसाट म्हणाले.

भाववाढीवर नियंत्रण मिळवले नाही, तर कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन आणखी तीव्र आंदोलन पुढच्या काळात शहरभर करणार असल्याचे आपचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष वहाब शेख यांनी म्हटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.