Chinchwad News : पोलिसांमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन असावे – अपर पोलीस महासंचालक डाॅ. रवींद्र सिंघ

एमपीसी न्यूज – पोलीस ‘फिट’ असावेत, असे सर्वजण बोलतात. मात्र कामाचा व्याप जास्त असल्याने पोलिसांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पोलिसांनी वेळ काढून ‘फिटनेस’कडे लक्ष द्यायला हवे. त्यासाठी पोलिसांमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन असणे आवश्यक आहे, असे मत राज्याचे अपर पोलीस महासंचालक डाॅ. रवींद्र सिंगल यांनी व्यक्त केले.

‘आपलं पुणे सायक्लोथॉन’ या स्पर्धेचे निगडी येथे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृहात जनजागृती व मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. सिंगल बोलत होते. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अल्ट्रासायकलिस्ट डॉ. हितेंद्र महाजन, दिव्या ताटे, आयर्नमॅन शुभम काजळे, सायकलपटू नीता नारंग, डॉ. महेंद्र महाजन उपस्थित होते.

डॉ. रवींद्र सिंगल म्हणाले, पोलिसांनी तंदुरुस्त रहावे यासाठी सायकलिंग, खेळ, स्पर्धा या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत. आयुष्यात काहीतरी मिळविण्याची इच्छा, काहीतरी करून दाखविण्याची जिद्द असावी. त्यासाठी अविरत प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रयत्नांमुळे आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. त्यातून चांगल्या पद्धतीने जगल्याचा आनंद आपल्याला मिळू शकतो. त्यासाठी आपल्याकडे बकेट लिस्ट असावी. प्रत्येकाने मानसिकदृष्ट्या सशक्त असावे. धावपळीत आपण आपल्याबद्दल विसरून जातो. आपण आपल्याबाबत विचार केला पाहिजे. चालणे, धावणे, सायकलींग यापैकी काही व्यायाम प्रकार केल्यास तुमचे जगणे सुसह्य होईल.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, अपयश हे एक आव्हान आहे. त्यामुळे प्रयत्न करणे सुरूच ठेवावे. तसेच आपल्या कक्षा रुंद कराव्यात. सायकल चालविण्याची नशा तुम्हाला स्वावलंबी बनवते. त्यातून आरोग्याच्या समस्या कमी होण्यात मदत होते.

डॉ. हितेंद्र महाजन म्हणाले, खेळ किंवा इतर छंद जोपासला तर आतील ताकद वाढते. रेस म्हणजे केवळ जोरात जाणे नव्हे तर प्रत्येक शर्यतीत, स्पर्धेत तुम्ही चुका किती कमी करता यालाही महत्व आहे. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आयुष्यात आणल्या तर जगण्याचा आनंद मिळतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.