Lonavala News : लोणावळा शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिवसेनेसोबतच – राजेश खांडभोर

एमपीसी न्यूज – लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनमानी पद्धतीने विषय मारून नेत असल्याने लोणावळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वपक्षीय 17 नगरसेवकांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांची लोकप्रतिनिधी या नात्याने भेट घेतली. याचा अर्थ ते नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत, असा होत नाही. शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिवसेनेसोबत असून पुढील निवडणुकीत शिवसेना सक्षमपणे उतरणार असल्याचे शिवसेना मावळ तालुका प्रमूख राजेश खांडभोर यांनी सांगितले.

लोणावळा नगरपालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेला 17 सर्व पक्षीय नगरसेवक हे नगराध्यक्षा यांच्या मनमानी कारभारा विरोधात एकत्र आले होते. त्या सर्व नगरसेवक यांची आमदार सुनील शेळके यांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी भेट घेतली. या भेटीचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. भेट घेतली म्हणजे शिवसेनेतील नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत असा अर्थ होत नाही असेही राजेश खांडभोर म्हणाले.

शिवसेना उपजिल्हा प्रमूख शरद हुलावळे यांनी सांगितले की, लोणावळा नगरपालिकेत नगरसेवकांना विश्वासात न घेता सभेमध्ये विषय मारून नेत बेकायदेशीर ठराव केला जात असल्याचा आरोप या सर्व नगरसेवकांनी केला आहे. ते लोणावळा शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एकत्र आले होते. शिवसेनेचे सर्व नगरसेवक एकसंघ असून या सर्व नगरसेवक व तेथील सर्व शिवसेना पदाधिकारी समवेत आम्ही लोणावळा नगरपालिकेला सक्षमपणे सामोरे जाणार असल्याचेही शरद हुलावळे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.