Pune News : पुण्याच्या अनन्या रानडेला हंगेरी येथे गणित ऑलिंपियाडमध्ये कांस्य पदक; महाराष्ट्रातील दोघींसह भारतातील चौघींनी मारली बाजी

एमपीसी न्यूज – हंगेरीमध्ये एगर येथे 11 वी युरोपियन मुलींच्या गणित ऑलिंपियाड स्पर्धेत चार भारतीय विद्यार्थिनींनी कांस्य पदक जिंकले आहे. त्यात पुण्याची अनन्या राजस रानडे, नाशिकची सानिका अमिल बोराडे, दिल्ली येथील अनुष्का अग्रवाल आणि गुंजन अग्रवाल यांनी या स्पर्धेत बाजी मारली आहे.

6 ते 12 एप्रिल या कालावधीत या स्पर्धा पार पडल्या. विजेत्या मुलींमध्ये अनन्य रानडे, अनुष्का अग्रवाल, सानिका बोराडे या इयत्ता बारावीच्या मुली असून गुंजन अग्रवाल ही इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे.

या विद्यार्थिंनीबरोबर त्यांचे मार्गदर्शकही उपस्थित होते. यामध्ये डॉ. अदिती सुनील फडके (नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे), पुलकित सिन्हा (आयआयएससी, बंगलुरू), रोहिणी जोशी (आयआयटी, मुंबई) यांचा समावेश होता.

ईजीएमओ 2022 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून कांस्य पदक विजेत्या विद्यार्थिनींपैकी अनुष्का आणि गुंजन या दोघी भगिनी आहेत. अनन्या आणि अनुष्का या दोघींचेही रौप्य पदक अगदी एका गुणाने हुकले. महामारीमुळे दोन वर्षे ऑलिंपियाड स्पर्धा होवू शकली नाही, त्यामुळे यंदा भारताने पूर्ण ताकदीने आणि तयारीने या स्पर्धेत आपले स्पर्धक उतरवले होते.

गणित ऑलिंपियाडमध्ये विजयी झालेला मुलींचा संघ बुधवार (दि. 13) रोजी पहाटे मुंबईला येत आहे. विजेते आणि त्यांचे मार्गदर्शक नेत्यांचा 13 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे.

होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (एचबीसीएसई)हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर), मुंबईचे राष्ट्रीय केंद्र आहे. प्राथमिक शाळेपासून ते पदवीपूर्व महाविद्यालयीन स्तरापर्यंत विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणामध्ये समानता आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे आणि देशातल्या वैज्ञानिक साक्षरतेच्या वाढीला प्रोत्साहन देणे हे केंद्राचे व्यापक उद्दिष्ट आहे.

 

एचबीसीएसई विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणिताच्या शिक्षणातील संशोधन आणि विकासासाठी देशातली प्रमुख संस्था आहे. ही संस्था गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र आणि ऑलिंपियाडच्या कनिष्ठ गटाच्या कार्यक्रमांसाठी भारताचे नोडल केंद्र आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.