Ola, Uber News : ओला, उबरचा प्रवास महागला; वाचा किती रुपयांनी वाढला टॅक्सी प्रवास

एमपीसी न्यूज – ओला आणि उबर या अॅप आधारित टॅक्सी सेवा देणा-या प्रमुख कंपन्या आहेत. देशभर पेट्रोल, डीझेल आणि सीएनजीच्या दरवाढीच्या भडक्यामुळे ओला आणि उबर या टॅक्सीमधून प्रवास करणे आता नागरिकांना महाग झाले आहे. कंपन्यांनी सुमारे 12 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पेट्रोल, डीझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन त्रासून गेले आहे. इंधन दरवाढीमुळे टॅक्सी सेवेवर देखील याचा मोठा प्रभाव पडला आहे. मागील काही दिवसांपूर्वी दिल्ली मधील टॅक्सी चालकांनी आपल्या गाडीत एक बोर्ड लावला होता. त्यामध्ये लिहिले होते कि, टॅक्सीमध्ये जर एसी लावायचा असेल तर दोन रुपये प्रती किलोमीटर प्रमाणे अधिक भाडे द्यावे लागेल. याची देशभर चर्चा झाली.

मात्र, टॅक्सी चालकांना इंधन दर वाढल्याने अशा प्रकारचे पाऊल टाकावे लागत असल्याचे देखील म्हटले जाऊ लागले. त्यानंतर ओला आणि उबर या कंपन्यांनी इंधन दरवाढ झाल्याने टॅक्सीच्या भाड्यांमध्ये सुमारे 12 टक्क्यांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. ओला आणि उबर या कंपन्यांसाठी रिक्षा पासून आलिशान कार काम करतात. कंपन्यांनी भाडेवाढ जाहीर केल्याने रिक्षा, टॅक्सी चालकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असला तरी नागरिकांना मात्र याचा फटका बसणार आहे.

उबर इंडिया आणि साउथ आशियाचे सेन्ट्रल ऑपरेशन हेड नितीश भूषण यांनी सांगितले कि, उबरने आपल्या टॅक्सी चालकांकडून मते जाणून घेतली. सध्या झालेल्या इंधन दरवाढीमुळे टॅक्सी चालकांना दिलासा देण्यासाठी उबरने दिल्ली आणि एनसीआर मध्ये 12 टक्के भाडेवाढ केली आहे. उबर तेलाच्या किमतीवर लक्ष ठेऊन आहे. तेलाच्या किमतीमधील बदलानुसार पुढे निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.