Dapodi News : अनिकेत हजारे यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा 

हजारे यांच्या आईची राज्य मानवी हक्क आयोगाकडे धाव

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने एका गुन्ह्यात अनिकेत हजारे यांना अटक केली. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा अनिकेत हजारे यांच्या आई सुनंदा रमेश हजारे यांनी केला आहे. तसेच याबाबत त्यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार देखील केली आहे.

अनिकेत हजारे यांचा स्टोन क्रशरचा व्यवसाय आहे. त्यांची मधल्या काळात व्यावसायिक ओळखीतून स्वप्नील बालवडकर यांच्याशी ओळख झाली. ‘तुम्ही माझ्या व्यवसायात गुंतवणूक केली तर मी तुम्हाला उत्तम परतावा देईन’ असे बालवडकर यांनी आमिष दाखवले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

व्यवसाय वाढीच्या उद्देशाने अनिकेत हजारे यांनी बालवडकर यांच्या व्यवसायात साडेआचार कोटी रुपये गुंतवले. त्याबाबत रीतसर करार केला. दिलेले पैसे तसेच परताव्याबाबत अनिकेत यांनी बालवडकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फोनवर बोलणे, प्रत्यक्ष भेटणे टाळले. प्रत्यक्ष भेटून पैशांची मागणी केली असता बालवडकर यांनी अनिकेत यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे देखील राज्य मानवी हक्क आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, बालवडकर यांनी अनिकेत यांच्या विरोधात सावकारी अधिनियमान्वये खोटा गुन्हा दाखल केला. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अनिकेत यांना चौकशीसाठी बोलावले. त्यांना सुमारे 10 तास बसवून घेतले आणि रीतसर गुन्हा नोंदवून अटक दाखवली. हे सर्व करताना अरेस्ट मेमो, वैद्यकीय तपासणी, नातेवाईकांना माहिती देणे अशा कायदेशीर प्रक्रियेबाबत पोलिसांनी उदासीनता दाखवली.

या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पोलीस अधिका-यांनी त्यांच्या अधिकारांच्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन गैरवापर केला आहे. बालवडकर हे एखाद्या व्यक्तीशी ओळख करतात. त्या व्यक्तीला आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पडून नंतर पोलिसांच्या ओळखीचा वापर करून सावकारी नियंत्रण कायद्यांअंतर्गत खोटे गुन्हे दाखल करतात, असा आरोप देखील तक्रारीत करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.