Pune News : पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी हेमंत रासने यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाने विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. रासने यांनी नगरसचिव शिवाजी दौंडकर यांच्याकडे सोमवारी आपला अर्ज दाखल केला.

स्थायी समितीच्या सदस्यांची मुदत 28 फेब्रुवारीला संपत असल्याने नवीन समिती अस्तित्वात येणे आवश्यक आहे. पालिकेच्या सभागृहाची मुदत 14 मार्चला संपुष्टात येत असल्याने या समितीला 14 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आला.

सत्ताधारी भाजपकडून रासने यांनी अर्ज भरला यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, आमदार सुनील कांबळे, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रदीप गायकवाड यांनी अर्ज भरला. विरोधी पक्षनेते दिपाली धुमाळ, विशाल तांबे, बंडू गायकवाड, बाळा ओसवाल उपस्थित होते.

ही निवडणूक येत्या शुक्रवारी 04 मार्चला सकाळी 11 वाजता पुणे महनगरपालिकेच्या नवीन इमारतीत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.