Pimpri News : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश येताच भाजपकडून ‘अब की बार 100 पार’चा नारा

कधीही निवडणुका लागल्यास भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सज्ज

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी हा पक्ष ‘केडर बेस’ आहे. आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकीसाठी कायम सज्ज असतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अब की बार 100 पार’हा आमचा निर्धार आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करीत आहोत, अशी प्रतिक्रीया भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आठवडाभरात जाहीर करा, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाला बुधवारी दिला. त्यामुळे महापालिका निवडणुका होणार की पुढे जाणार? याबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

यापार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे म्हणाले की, भारतीय संविधानाने सर्वोच्च न्यायालयाला सर्वाधिकार दिलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक कार्यकाळ 5 वर्षे पूर्ण झाला आहे. अशा संस्थामध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्तकाळ प्रशासक ठेवता येणार नाही, अशी संविधानामध्ये तरतूद आहे. मात्र, राज्यातील अनेक महापालिकांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्तकाळ प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुरू होता. आता सर्वोच्च्य न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. शहरात एकूण 6 मंडल आहेत. मंडल पदाधिकाऱ्यांची संख्या 550 इतकी आहे. जिल्हा कार्यकारिणी 150 पदाधिकाऱ्यांची आहे. शहरात एकूण 353 शक्तीकेंद्र प्रमूख कार्यरत आहेत. अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे 1 हजार 308 इतके बूथप्रमुख कार्यरत आहेत. आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सोबत आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुकीत निश्चितपणे यशस्वी होणार आहोत, असा दावाही आमदार लांडगे यांनी केला आहे.

ओबीसी आरक्षणाला महाविकास आघाडीमुळेच खोडा…

राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, ही आमची मागणी होती. यापुढील काळातही राहणार आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे केवळ वेळकाढूपणा केला. ओबीसी आरक्षणाबाबत ट्रिपल टेस्ट करण्यात आली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानेच आता राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे ओबीसी समाजाची मोठी हानी झाली आहे, अशी टीकाही आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.