Alandi : तीन प्लेट भजीसाठी टपरी चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – तीन प्लेट भजी पार्सल बांध, म्हणून टपरी चालकाला सांगितले. टपरी चालकाने थोडा वेळ थांबण्यास सांगितले. यावरून तरुणाने टपरी चालकाला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. हा प्रकार बुधवारी (दि. 22) सकाळी दहाच्या सुमारास चाकण चौक आळंदी येथे झाला.
बाळासाहेब रामचंद्र वायकुळे (वय 47, रा. परशुराम बाबानगर, केळगाव, ता. खेड, जि. पुणे) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिग्या उर्फ दिगंबर विठ्ठल कदम (वय 29, रा. गोपाळपुरा, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीमध्ये चाकण चौकात आळंदी नगरपालिकेची मोकळी जागा आहे. त्या जागेत चहा-नाष्ट्याच्या टप-या लावण्यात आल्या आहेत. तिथेच वायकुळे यांची रामभरोसे वडापाव सेंटर ही टपरी आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता दिग्या हातात कोयता घेऊन आला. त्याने वायकुळे यांना तीन प्लेट भजी पार्सल द्यायला सांगितले. वायकुळे यांनी काही कारणास्तव थोडा वेळ थांबण्यास सांगितले. यावरून चिडून दिग्याने कोयत्याचा धाक दाखवून वायकुळे यांना बेदम मारहाण केली. टपरीमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ रस्त्यावर फेकून दिले. टपरीच्या गल्ल्यातील 200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा करून परिसरात दहशत पसरविली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आळंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.