Bharati University : डॉ. एस. एफ. पाटील यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य प्रेरक

एमपीसी न्यूज : डॉ. शिवाजीराव कदम (Bharati University) म्हणाले, “पाटील सर विद्यार्थी घडवत होते, पण त्यांना शिस्त लावण्याचे काम मायाताईंनी केले. ते सतत कार्यमग्न असत. पाटील सरांचे काम खूप मोठे आहे. यांची श्रीमंती माणसांनी मोजावी अशी आहे. बँक बॅलंस अनेकांकडे असेल; पण माणसांचा प्रचंड बॅलंस असणारा हा माणूस आहे. कामात आनंद अनुभवणारा हा माणूस आहे. कामाविषयी आत्मिक प्रेम त्यांच्यात आहे,” असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी केले.
भारती विद्यापीठ व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे (Bharati University) माजी कुलगुरू प्रा. डॉ. एस. एफ. पाटील यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांनी आयोजित सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात डॉ. कदम बोलत होते. डेक्कन जिमखाना येथील सुवर्ण स्मृती मंगल कार्यालयात झालेल्या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रिडिएशन कौन्सिलचे (नॅक) अध्यक्ष प्रा. डॉ. भूषण पटवर्धन, प्रा. डॉ. पाटील यांच्या पत्नी मायादेवी पाटील, माजी कुलगुरू प्रा. राम ताकवले, डॉ. ए. एस. भोईटे, सोहळा समितीतील प्रा. डॉ. नीलिमा राजूरकर, प्रा. डॉ. सुधीर उजळंबकर यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील प्राचार्य, डॉ. पाटील यांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. डॉ. एस. एफ. पाटील यांची मंत्रोच्चाराच्या घोषात विविध धान्य तुला करण्यात आली. हे धान्य मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या कोथरूड येथील जीवनज्योत संस्थेला दान देण्यात आले. त्याचबरोबर डॉ. पाटील यांचे 81 दिव्यांनी औक्षण करण्यात आले. डॉ. नीलिमा राजूरकर यांनी पाटील यांच्यावर लिहिलेल्या ‘डॉ. एस. एफ. पाटील : व्रतस्थ विज्ञान महर्षी’ या पुस्तकाचे, तसेच प्रा. डॉ. सुधीर उजळंबकर यांनी डॉ. पाटील यांच्या जीवनावर बनवलेल्या शब्दकोड्याचे प्रकाशन झाले.
डॉ. शिवाजीराव कदम (Bharati University) म्हणाले, “शेतकरी कुटुंबातून मोठ्या कष्टाने ते वर आले. असा चांगला माणूस मिळणे दुरापास्त आहे. जळगाव, धुळे भागातील विद्यार्थ्यांचे त्यांनी पालकत्व स्वीकारले, मायेचे बळ दिले, हे त्यांचे सर्वात महत्वाचे काम आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा त्यांचा स्वभाव भावतो. त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झाडे लावून पर्यावरण संरक्षणाचे एक उदाहरण घालून दिले.”
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “कार्यमग्नता, समाजहित, लोकोपयोगी शिक्षण व संशोधन याचा ध्यास घेतलेल्या डॉ. एस. एफ. पाटील यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य प्रेरक आहे. समाजभान, माणूसपण जपणारा व शिकवणारा प्राध्यापक, कुलगुरू, प्रशासक अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्यावरील संस्कार, त्यांचे विविध पैलू, सोज्वळ व सात्विक स्वभाव, नैतिक मूल्ये यासह त्यांच्या कारकिर्दीतील सर्व पदांचा आढावा या सोहळ्याच्या निमित्ताने घेतला गेला.”
प्रा. डॉ. एस. एफ. पाटील म्हणाले, “जीवनाच्या या टप्प्यावर मागे वळून बघताना नक्कीच आनंद होत आहे. सुखी माणसाचा सदरा मला मिळाला, असे माझे जीवन आहे. माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या जीवनात खूप चांगले काम केले याचे समाधान आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला आजही लक्षात ठेवले आहे, याचा विशेष आनंद होतो. विद्यार्थ्यांचे भरभरून प्रेम मिळाले म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो.”

डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, “डॉ. पतंगराव कदम यांनी बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजीराव कदम यांनी घेतलेल्या कष्टात डॉ. पाटील यांची मोठी साथ लाभली आहे. विद्यार्थी धनात पाटील सर अब्जाधीश आहेत, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही.”

 

प्रा. डॉ. सुधीर उजळंबकर यांनी सूत्र संचालन केले. डॉ. नीलिमा राजूरकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. पाटील यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.