Bhosari : भोसरी मतदारसंघात ‘खोटे बोल पण रेटून बोल’चा जोमात प्रचार – धनंजय भालेकर

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघात सध्या “खोटे बोल पण रेटून बोल”चा प्रचार जोमात सुरू आहे. भोसरी परिसरात पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्था आल्याचा अपप्रचार करून मतदारांची शुद्ध फसवणूक केली जात असल्याचा आरोप करत भोसरीमध्ये एक तरी नामांकित शैक्षणिक संस्था आली आहे काय? हे आता मतदारांनीच शोधून काढावे, असे शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्ग भोसरी विधानसभा मतदारसंघात हजारो घरांचा प्रकल्प साकारला जात असल्याचा भुलभुलैय्या निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात चिखली येथे गोरगरीबांना घरे देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या घरकुल प्रकल्पाचे काम दहा-अकरा वर्षे झाले तरी अद्याप पूर्ण नाही. या प्रकल्पाकडे गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी साधे ढुंकूनही पाहिलेले नाही.

हेच सत्ताधारी आता निवडणुकीमुळे वाटेल तशा खोट्या बातम्या पसरवण्याचे काम करत आहेत. अशा खोट्या प्रचाराला भोसरी मतदारसंघातील मतदारांनी बळी पडू नये, असेही भालेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना सर्व समाज घटकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या विरोधकांनी खोटे बोल पण रेटून बोलचा अपप्रचार सुरू केला आहे. न झालेली कामे सुद्धा झालीच आहेत अशा पद्धतीने नागरिकांना सांगितली जात आहेत, असेही भालेकर यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.