Pune News : सायबर गुन्हे रोखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

एमपीसी न्यूज :  शहरात सायबर गुन्हे वाढत असताना त्याला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सायबर पोलिस ठाण्याची पुर्नरचना केली आहे. आता गुन्ह्याच्या प्रकारानुसार सायबर पोलिस ठाण्याची पाच युनिट राहणार असून त्यांना त्याच प्रकारच्या गुन्ह्याचा तपास दिला जाणार आहे. त्यामुळे सायबर गुन्हे उघडकीस आणण्यास अधिक मदत होणार आहे.

शहरात सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. गेल्या वर्षी सायबर गुन्ह्यांचे तब्बल १५ हजार अर्ज सायबर पोलिस ठाण्यात आले होते. प्रत्येक वर्षी सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सायबर पोलिस ठाणे सक्षम करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी या ठिकाणचे मनुष्यबळ वाढविण्याबरोबर कामात सुसुत्रता आणण्याचे नियोजन करण्यात आले होते.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सायबर गुन्हे शाखेकडे लक्ष दिले जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार सायबर गुन्ह्याच्या प्रकारानुसार आता पाच युनिट तयार करण्यात आली आहेत. गुन्ह्यांच्या स्वरुपानुसार त्या त्या युनिटकडे संबंधित गुन्हे तपासासाठी दिले जाणार आहेत.

पुर्वी एकाच तपास अधिकार्‍याकडे विविध प्रकारचे गुन्हे तपासासाठी दिले जात होते. त्यामुळे वेळ आणि श्रमाचा अपव्यय होताना दिसत होता. नव्याने केलेल्या बदलामुळे आता तपास अधिकाऱ्यांकडे एकाच प्रकारचे गुन्हे तपासासाठी दिले जाणार आहेत. हॅकिंग/डाटा चोरी, ऑनलाईन बिझनेस फ्रॉड, चिटिंग फ्रॉड, सोशल नेटवर्किग आणि एटीएम कार्ड फ्रॉड अशी ही पाच युनिट काम करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.