Pune News : महापालिका निवडणुकीआधी पुण्यात भाजपला मोठा धक्का, वाचा काय घडलं?

एमपीसी न्यूज : अवघ्या काही दिवसांत पुणे महानगरपालिकेची मुदत संपणार आहे आणि त्यानंतर महापालिकेसाठी निवडणूक होणार आहे. पण त्या आधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांना देण्यात आलेले सभागृहनेते पद उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. महापालिकेची मुदत अवघ्या काही दिवसांवर आली असताना भाजपला आज जबर धक्का बसला आहे. 

गणेश बिडकर हे स्वीकृत नगरसेवक आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले ते मानले जातात. त्यामुळेच त्यांची वर्णी स्वीकृत नगरसेवकपदी झाली. त्यानंतर त्यांना महापालिकेतील महत्त्वाचे सभागृहनेते पद देण्यात आले. दरम्यान बिडकर यांची महापालिकेच्या सभागृह नेतेपदी निवड केल्याने काँग्रेस पुरस्कृत अपक्ष नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सप्टेंबर महिन्यात या याचिकेवर सुनावणी पार पडली. तेव्हापासून याचा निर्णय प्रलंबित होता त्यानंतर सोमवारी यावर सुनावणी पार पडली.

स्वीकृत नगरसेवक असलेल्या व्यक्तीला सभागृहनेते पद देता येत नाही. त्यामुळे बिडकर यांचे पद रद्द करावे आणि त्यांच्या काळात झालेले सर्व निर्णयही रद्द करावेत, अशी मागणी याचिकेतून केली होती. दरम्यान सुनावणीनंतर न्यायालयाने पद रद्द करण्याचा निर्णय दिला. बिडकर यांच्याकडून मात्र या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कुठलीच प्रतिक्रिया आली नाही. न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देऊ, असे बिडकर यांच्या वतीने सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.