Pune News : भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं पुणे पोलिसांना पत्र, म्हणाल्या रघुनाथ कुचिक प्रकरणात..

एमपीसी न्यूज : रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात नाट्यमय वळण आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आता पुणे पोलिसांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे. पीडित तरुणीला मीच मदत केली. मात्र या प्रकरणात आता माझ्यावरच खोटे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी या पत्राद्वारे केली आहे.

चित्रा वाघ यांनी लिहिलेलं हे पत्र पुणे पोलीस आयुक्त सोबतच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्याकडेही दिले आहे.

रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्कार करून जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप करणाऱ्या तरुणीने चित्रा वाघ यांच्यावरच गंभीर आरोप केलेत. चित्रा वाघ फेसकॉलर माझ्याशी बोलायच्या आणि मला मेसेज पाठवायला लावायच्या. चित्रा वाघ यांनीच मला मेसेज पाठवायला सांगितले होते. तसेच चित्रा वाघ यांना माझे काहीही पडलेले नाही. त्यांचा सगळा रोख आहे तो रघुनाथ कुचिक यांच्यावर. पीडितेच्या या आरोपानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी स्वतः पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.