Pune News : भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह 300 जणांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या सत्काराला मर्यादित लोकांनाच परवानगी दिली असताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमवून, धक्काबुक्की करून गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक आणि भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह तीनशे जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक दीपक पोटे, राजेश येनपुरे, पदाधिकारी बापू मानकर, धनंजय जाधव, दत्ता खाडे, गणेश घोष, प्रतीक देसरडा यांच्यासह तीनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर भाजपच्या वतीने शनिवारी किरीट सोमय्या यांचा पुणे महानगरपालिकेत सत्कार करण्यात आला. मर्यादित लोकांच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम करण्यात यावा अशा सूचना पोलिसांनी यापूर्वीच दिल्या होत्या. परंतु या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले होते. त्यांनी केलेल्या धक्काबुक्कीत पोलिसांना किरकोळ इजा झाली तर काही पोलिसांच्या ड्रेसवरील नेमप्लेट या धक्काबुक्कीत तुटून पडल्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.