Blog By Devdatta Kashalikar : दारू प्या, पण व्यायाम नका करू

एमपीसी न्यूज – सध्या राज्य सरकारच्या अनलॉकच्या नव्या टप्प्यात राज्यातील बार दिनांक 5 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहेत, पण त्यासोबतच जिम आणि व्यायामशाळांवरील बंदी मात्र उठवण्यात आलेली नाही. याच विषयावरील देवदत्त कशाळीकर यांचा ब्लॉग आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत.
———————

मायबाप सरकारने कालच एक सूतोवाच केले आहे की, राज्यात 5 तारखेपासून बार सुरु होतील, पुन्हा एकदा मयखाने रंगतील, पेग वर पेग झडतील. आसन क्षमतेच्या तुलनेत अमूक टक्के वैगरे हे सर्व सांगायला बोलायला राहील, कदाचित फक्त कागदावर राहील. असेही बार बंद कधी होते हा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो हे सर्वांना माहीत आहेच. फक्त उघडपणे कुणी बोलत नव्हते एवढंच. कारण, कसलीच मोजदाद करायला ना मनुष्यबळ आहे ना यंत्रणा…

असो देशाच्या अर्थव्यवस्थेला ”हातभार” वैगरे लागण्याचे पुण्यकर्म होणार असेल त्यातून कदाचित.. पण मूळ विषय हा आहे की, भरपूर वेळा सरकार दरबारी जिम मालकांनी जोर बैठका मारूनही सरकारला जिम सुरु कराव्या असं वाटत नाहीये.

फिटनेस हा सरकार दरबारी सर्वात गौण विषय आहे हे आजवर सिद्ध होत आलंय. जिम मध्ये आपण काय करता हे आम्हला माहीत आहे, असे ”गौरवोद्गार” एका मोठ्या नेत्याने हल्लीच एका चर्चेदरम्यान एका नामवंत बॉडी बिल्डरपाशी काढले, हे ऐकून व्यायाम करून आजवर धाप लागली नसेल एवढी धाप एकाच वेळी त्याला लागली असावी. एकूण काय तर कितीही प्या पण व्यायाम जिम वैगरे बद्दल काही बोलू नका, असा एकूण वरचा जो सूर आहे त्याला आता वेगळा वास येऊ लागला आहे. ”अर्थव्यवस्थेला” हातभार हा भाग त्यात असावा. व्यायाम वैगरे फालतू गोष्टी आहेत, असा एक प्रकारे संदेश यातून मिळतोय .

विषय जास्त ऐरणीवर येण्याचे कारण म्हणजे मार्च महिन्यापासून जिम बंद आहेत.  अनेक संघटनांनी त्यासाठी निवेदने दिली, रस्त्यावर डंबेल मारले, पावसातही निदर्शने केली,  पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

आधीच मंद प्रकाशात दरवळणारे बार हे जवळपास काळोखात का होईना मागील दाराने सुरु होते, दारूच्या दुकानावरील रांगा याच जन्मात आपल्याला पाहायला मिळाल्या व जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतसुद्धा समावेश होईल की काय, असेही काहीवेळ वाटत राहिले. ट्रेन सुरु झाल्या, एस. टी. पण तोट्यात आहे म्हणत हळू हळू सुरु झाली. आता एस. टी.  पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली. माणूस महाराष्ट्रात व राज्याबाहेरही शेजारी शेजारी बसून आठ आठ तास प्रवास करू लागला.

बंद एसटीमध्ये 8 तास शेजारी बसून प्रवास करणे हे आम्हाला चालते. पण जिमबद्दल अद्याप कुणीच बोलत नाही. व्यायामाने मन एकाग्र होते, ऊर्जा वाढते, सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागतो, इम्युनिटी डेव्हलप होते, हे सर्व कदाचित सरकारला खोटं वाटत असावं.

तीन वेळा मिस्टर युनिव्हर्स, तीन वेळा मिस्टर वर्ल्ड, ६ वेळा मिस्टर इंडिया असलेल्या पिंपरी चिंचवड मधील युथ आयकॉन संग्राम चौगुले सोबत बातचीत केली असता तो म्हणाला, ‘फिट इंडिया’चा मी ब्रँड अँबेसिडर आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूला वर्ग एक पदाची सरकारी नोकरी देण्याची तरतूद आहे. असे असतानाही आम्हाला नोकरी नको, पण निदान जिम सुरु करायला परवानगी द्या, असे तो म्हणतो.

आज देशातील हजारो तरुणांनी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत जिमचे साहित्य बनवणे हा उद्योग सुरु केला, शेकडो युवकांनी जिमचा व्यवसाय सुरु केला, आज हे सर्वजण थकले आहेत.  कुठल्याही पावडरमुळे पुन्हा तरतरी येईल, अशी आता तरी स्थिती नाहीये. जिम म्हटले की, मोट्ठी म्हणजे किमान हजार चौरस फुटांची जागा आली, आज जागेचं भाडे काही लाखांच्या घरात आहे, जागामालक रुपया कमी करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये,  जिम मालकांच्या मनावरील ताण खूप वाढला आहे. यातून कुणी गावाकडची शेती विकली कुणी जिमचे साहित्य विकले, तर कुणी आत्महत्या केल्या, कुणीच वाली नाही अशी स्थिती आज झाली आहे.

सोशल डिस्टन्स, बॅचेस वाढवून तसेच वारंवार सॅनेटाईज करून जिम यापूर्वीच सुरु करता आल्या असत्या पण सर्वंकष विचार करायला वेळ कुणाला? कोविडच्या एकूण विषारी फटक्यात जिममधील यंत्रणा व जिम मालक कधीच गारद झाले आहेत. माणूस केंद्रस्थानी ठेऊन नक्की गरजा लक्षात घेऊन नियम अटी बनवणे याचा आपल्याकडे नेहमीच अभाव असतो. सरधोपट मार्गाने जेव्हा नियम बनवले जातात त्याचवेळी नियमाची पायमल्ली होते हे शासनाला कधी कळणार माहीत नाही!

आर्थिक घडी नीट ठेवण्यासाठी हवे आहे अचूक नियोजन. यश येताना दिसले नाही की जनतेच्या माथ्यावर खापर फोडायचे, ही जुनी सवय आता प्रस्थापितांनी सोडली पाहिजे.  पुण्यात जम्बोबाबत जे काही घडलं ते सर्वश्रुत आहे. नियोजनाचा अभाव हेच त्यामागचं प्रमुख कारण आहे.  एकूणच काय तर ”जिम” हा विषयच आता कृश झालाय. आर्थिक कणा मोडलेल्या जिमला गरज आहे एका स्ट्राँग बूस्टरची.

सामर्थ्यवान बलशाली भारताची स्वप्न पाहताना, आपण एका छोट्या विषयात सुद्धा सुवर्णमध्य काढू शकत नाहीये, हे मायबाप सरकारच्या अद्याप तरी ध्यानात आलेले दिसत नाही.. जास्त टेन्शन घेऊ नका.. बार मात्र लवकरच सुरु होत आहेत., जिमचं पाहू नंतर… एवढी काय घाई आहे भाऊ…?

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.