Lonavala News : लोणावळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दरोडा टाकण्याआधीच टोळीला केले जेरबंद

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला लोणावळा शहर पोलिसांनी आज जेरबंद केले. यामध्ये चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे.

सोहेल जावेद शेख (वय 20 वर्षे) व ओमकारसिंग अवतारसिंग जुनी (वय 21 वर्षे व दोन अल्पवयीन मुले सर्व रा. वैदवाडी हडपसर पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दरोड्यासाठी आणण्यात आलेले लोखंडी गोल पाईप, कटावण्या, लाल रंगाची छन्नी, विळा, स्क्रू ड्रायव्हर, वस्तारा, चाकू, ब्लेडच्या पाती, कात्री, वायर कटर, लाल मिरचीची पुड असे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.

लोणावळा शहर पोलिसांचे स्थानिक गुन्हे प्रकटीकरण पथक व पोलीस कर्मचारी यांची रात्रगस्त सुरु असताना, पोलीस काँन्स्टेबल सतिश कुदळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, खंडाळा गावच्या हद्दीत टाटा डक लाईन येथील पडीक डिपी रूम मध्ये काही इसम दरोडा घालण्याचे तयारीत बसलेले आहेत.

या माहितीच्या आधारे लोणावळा शहरचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने खंडाळा गावचे हद्दीतील टाटा डक लाईनचे जवळ असलेल्या पडीक डी.पी रूम समोर सापळा लावला, याची माहिती समजताच पलायन करत असताना चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळाला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक श्री सिताराम डुबल यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक लतिफ मुजावर, पोलीस अंमलदार सुनिल देशमुख, प्रविणकुमार गोसावी, शेखर कुलकर्णी, सतिश कुदळे, पवन कराड, शंकर धनगर, मनोज मोरे, नितिन सुर्यवंशी, स्वप्नील पाटील, पोलीस मित्र विनोद चव्हाण यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.