Chakan Crime News : सातारा – सांगलीतून येऊन चाकण परिसरात लुटमार, घरफोडी ; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – सातारा – सांगली येथून येऊन चाकण परिसरात लुटमार, घरफोडी करणा-या चौघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने शुक्रवारी (दि.13) वाकड, काळाखडक याठिकाणी ही कारवाई केली. त्यांच्याकडून तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

अनिकेत ऊर्फ माम्या आबासो टेळे (वय 22, रा. कोळेवाडी, ता. कराड, जि. सातारा), सौरभ पांडूरंग राशीवडेकर (वय 21, रा. तडवळे-कदमवाडी, ता. शिराळा, जि. सांगली), अंकित महादेव थोरात (वय 21, रा. तारुख, ता. कराड, जि. सातारा) व पवन सुरेश कदम (वय 19, रा. तडवळे-कदमवाडी, ता.शिराळा, जि. सांगली) असे ताब्यात घेतलेल्या चार आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी चाकण परिसरात येऊन चाकूचा धाक दाखवून लूटमार करायचे. तसेच, घरफोडी करुन साहित्य चोरी करायचे. 11 जुलै रोजी निघोजे येथे एका इसमाला चाकूचा धाक दाखवून त्याच्या कडून मोबाईल, रोख रक्कम व एटीएम कार्ड जबरदस्तीने घेतले होते. याप्रकरणी म्हाळुंगे चौकीत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी याबाबत तपास केला असता एक टोळी सातारा-सांगली येथून येऊन चाकण परिसरात लुटमार, घरफोडी करत असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, हे आरोपी शुक्रवारी (दि. 13) वाकड, काळाखडक याठिकाणी चोरीचा माल विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून दहा मोबाईल, दोन मोटार सायकल आणि एक एटीएम कार्ड असा एकूण 2 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.