Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले पुण्याच्या मानाच्या गणपतींचे दर्शन

एमपीसी न्यूज : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पुणे दौऱ्यावर आहेत. हा दौरा केवळ गणपती दर्शनासाठी असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी सर्वप्रथम कसबा पेठेतील पुण्याचा पहिला मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले. तसेच, त्यांना आरतीचा मानही देण्यात आला.

कोरोनाच्या साथीमुळे 2020 पासून दोन वर्षे निर्बंधांमुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान शासनाने निर्बंध दूर केल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. सर्व गणेशमंडळांनी कल्पकतेने देखावे साकारले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने बाहेर पडत असून भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

Devendra Fadnavis : रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार

कसबा पेठेत दुपारी दोन वाजता भेट दिल्यानंतर (Eknath Shinde) त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. तेथेही त्यांच्या हस्ते गणरायची आरती करण्यात आली.

महात्मा फुले मंडई येथील अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, तुळशी बाग येथील तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लक्ष्मी मार्ग येथील गुरुजी तालीम मंडळ, केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक वाडा गणेशोत्सव मंडळ, सदाशिव पेठ येथील छत्रपती राजाराम मंडळ, नवी पेठ येथील यशवंत नगर गणेशोत्सव मंडळ, कोथरुड येथील श्री साई मित्र मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा मंडळांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

केसरीवाडा येथे गणेशदर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री यांनी आमदार मुक्ता टिळक यांची भेट घेतली. त्यावेळी श्रीमती टिळक यांनी गणेशोत्सवाच्या जुन्या आठवणी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या.

संध्याकाळी त्यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घरी उपस्थित राहून त्यांच्या घरी स्थापन केलेल्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी नाना पाटेकर यांच्यासोबत विविध विषयांवर त्यांच्या गप्पा रंगल्या. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे आणि पाटेकर कुटूंबातील सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे गणेश मंडळांना भेटी देऊन दर्शन घेत असताना नागरिकही शिंदे यांना भेटण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. मुख्यमंत्र्यांनीही गाडीतून बाहेर येत त्यांची भेट घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.