Chinchwad : दिल्लीत चोरलेल्या कार महाराष्ट्रात विकणारी टोळी जेरबंद; तब्बल दीड कोटींच्या 11 कार हस्तगत

एमपीसी न्यूज – दिल्लीत चोरलेल्या कार बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्रात (Chinchwad) विकणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली. या कारवाईमध्ये एक कोटी 57 लाख रुपये किमतीच्या 11 आलिशान कार हस्तगत करण्यात आल्या असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली.

हिंजवडी परिसरात एक वाहन चोर येणार असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकातील सहायक फौजदार महेश खांडे आणि पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांना मिळाली. त्यानुसार शशिकांत प्रताष काकडे (वय 30, रा. साखरवाडी, पिंपळवाडी, ता. फलटण, सातारा), अजीम सलीम पठाण (वय 34, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव, सातारा) या दोघांना दोन कारसह ताब्यात घेण्यात आले. त्यातील एक कार चाकण परिसरातून चोरी झाली होती. त्याबाबत सन 2021 मध्ये चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दोन्ही आरोपींकडे मिळालेल्या गाड्यांव्यतिरिक्त आणखी चोरीच्या गाड्या असून त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्या गाड्यांचे व्यवहार केले असल्याचे समोर आले. त्यानंतर चाकण येथे दाखल असलेला वाहन चोरीचा गुन्हा दरोडा विरोधी पथकाकडे तपासासाठी वर्ग करण्यात (Chinchwad) आला. दोघांकडून दिल्ली, हरियाणा, आणि राजस्थान येथील एक कोटी 57 लाख रुपये किमतीची 11 आलिशान चारचाकी वाहने जप्त करण्यात आली.

शशिकांत आणि अजीम यांच्यासोबत राजाराम उर्फ राजू तुकाराम खेडेकर (वय 34, रा. पटवर्धन कुरोली, ता. पंढरपूर, सोलापूर), महेश भीमाशंकर सासवे (वय 31, रा. विजापूर रोड, सोलापूर), प्रशांत माने (रा. रहिमतपूर, सातारा), विकास माने (रा. रहिमतपूर, सातारा), भरत खोडकर (रा. सांगली), हाफिज (रा. मेरठ, उत्तर प्रदेश), इलियास (रा. बेंगलोर), रसूल शेख (रा. इचलकरंजी, कोल्हापूर) अशी अंतरराज्यीय टोळी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपींमध्ये पोलिसाचाही समावेश

आरोपी भरत खोडकर हा सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे. तो देखील आपल्या इतर साथीदारांना वाहन चोरी आणि त्याची विक्री करण्यासाठी मदत करत असे. दरोडा विरोधी पथकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे.

बनावट नोटा आढळल्या

आरोपी महेश सासवे याच्याकडे 500 रुपये दराच्या दोन बनावट चलनी नोटा मिळून आल्या आहेत. त्याबाबत नवीन गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

विमान प्रवास करून करायचा वाहन चोरी

आरोपी अजीम पठाण याला सन 2023 मध्ये सातारा पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून अशाच प्रकारे नऊ चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. अजीम पठाण हा दिल्ली येथे विमानाने जात असे. तिथे सहकाऱ्यांच्या मदतीने वाहन चोरी करीत असे. तिथे चोरलेल्या वाहनांची महाराष्ट्रात कमी किमतीत विक्री करीत असे. त्यासाठी अजीम हा वाहने खरेदी करणाऱ्या नागरिकांना बनावट कागदपत्रे देत असे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, राहुल खारगे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, आशिष बनकर, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रवीण कांबळे, गणेश कोकणे, अमर कदम, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, समीर रासकर, चिंतामण सुपे, नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.