Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये एका आठवड्यात विनामास्क प्रकरणी 488 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना आणि कोरोनाचा उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. मात्र अनेकजण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी मागील एका आठवड्याच्या कालावधीत 488 जणांवर विनामास्क प्रकरणी कारवाई केली आहे.

कोरोनाची तिसरी लाट आल्याचे सांगण्यात येत आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या पीकवर असेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. सध्या रुग्णवाढ होत असली तरी गंभीर रुग्णांचे, रुग्णालयात दाखल करावे लागणा-या बाधितांचे प्रमाण अतिशय कमी आहे. लक्षणे नसणा-या कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी असले तरी धोका आहेच, त्यामुळे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क वापरणे बांधकारक करण्यात आले आहे. तसेच सामाजिक अंतर राखणे, उघड्यावर न थुंकणे, गर्दी न करणे, कोरोनाचा प्रादुर्भाव होईल असे कोणतेही वर्तन करू नये असे आदेश शासनाने दिले आहेत. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी 16 भरारी पथके नेमली आहेत. ही भरारी पथके विनामास्क व उघड्यावर थुंकणा-या नागरीकांवर कारवाई करत आहेत.

सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क नसल्यास 500 रुपये दंड तर उघड्यावर थुंकल्यास एक हजार रुपये दंड नागरिकांकडून घेतला जाणार आहे. दुकाने, शॉपिंग मॉल, इतर आस्थापनांमध्ये गर्दी न करण्याबाबत पोलिसांनी आवाहन केले आहे. गर्दी केल्यास संबंधित आस्थापनांवर देखील कारवाई होणार आहे. कोरोना प्रतिबंध लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच मॉलमध्ये प्रवेश आहे. लसीकरण न केलेल्या नागरिकांना लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी मागील आठवड्यापासून विनामास्कची कारवाई करण्यासाठी पुन्हा सुरुवात केली आहे. विनामास्क फिरणा-या नागरिकांना दंड ठोठावणे, नागरिकांकडून पैसे वसूल करणे हा या कारवाईचा उद्देश नाही. तर नागरिकांना शिस्त लागावी, नागरिकांनी कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करावे असा उद्देश आहे. 4 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 488 जणांवर कारवाई केली आहे.

आठवडाभरात केलेली कारवाई –
4 जानेवारी – 120
5 जानेवारी – 58
6 जानेवारी – 77
7 जानेवारी – 46
8 जानेवारी – 40
9 जानेवारी – 56
10 जानेवारी – 91

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.