Pune News : बाईक शेअरिंगद्वारे प्रवासी वाहतूक सेवा पुरवणारी ॲप्स बंद करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – प्रवासी वाहतुकीसाठी दुचाकींचा (बाईक शेअरिंग) बेकायदेशीरपणे वापर करणारी ॲप्स तात्काळ बंद करावीत, असे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दिले आहेत. याबाबत कार्यालयाने पुणे सायबर पोलिसांना आदेश दिले आहेत.

या संदर्भात ‘उबर’ आणि ‘झूमकार’च्या अमिगो या प्रवासी वाहतूक कंपन्यांसोबत नुकतीच एक बैठक पार पडली. आदेशानंतर कंपन्यांनी थोडा वेळ मागितला आहे. महाराष्ट्र रिक्षा सेनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी परिवहन विभागाला पत्र लिहून प्रवासी वाहतुकीसाठी दुचाकी वाहनांच्या अवैध वापराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. तसेच, परिवहन विभागाने सायबर पोलिसांना याबाबत पत्र दिले होते.

Uber, Amigo by Zoomcar, Rapido आणि Ola या कंपन्या प्रवासी वाहतुकीसाठी दुचाकी (बाईक) वापरत आहेत. या कंपन्यांनी व्यावसायिक कारणांसाठी दुचाकी वापरण्याची परवानगी घेतली नाही. परिवहन विभागाने असा कोणताही परवाना जारी केलेला नाही. खाजगी कंपन्या त्यांच्या ॲप्सवर बुकिंग घेऊन दुचाकींद्वारे अवैध प्रवासी वाहतूक व्यवसाय करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सायबर पोलिसांना पत्र पाठवून बेकायदेशीर वेबसाइट आणि ॲप सेवा तात्काळ बंद करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.