Nigdi News: मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतपेढीत अध्यक्षाकडून गैरव्यवहार?; 10 सभासदांचा आरोप

सभासदांची उपनिबंधकांकडे धाव, घटनाबाहय कामकाजाची चौकशी करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथील मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतपेढीचे अध्यक्ष कामगारांना विश्वासात न घेता मनमानीपणे कारभार करत आहेत. राजीनामा झाल्यानंतरही ते पतसंस्थेचे सभासद, संचालक म्हणून कार्यरत आहेत. नियमबाह्य कामे करून मोठ्या प्रमाणावर संस्थेची आर्थिक लुट केली जात आहे. सहकार खात्याची नियमावली झुगारून संस्थेसाठी चक्क रेडझोनमध्ये मोकळा भूखंड घेण्याचा प्रताप या कारभाऱ्यांनी केल्याचा आरोप, पतसंस्थेच्या 10 सभासदांनी केला. याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्षांविरोधात पुणे सहकारी संस्थेच्या उपनिबंधकांकडे तक्रार करुन चौकशीची मागणी केली आहे.

उपनिबंधकांना पोस्टाद्वारे पाठविलेल्या पत्रात या 10 सभासदांनी म्हटले आहे की, मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतपेढीचा कारभार संस्थेचे अध्यक्ष आणि चेअरमन एकटेच अनाधिकारपणे स्वतंत्रपणे करत आहेत. पोटनियमातील तरतुदीनुसार माथाडी मंडळाचे नोंदीत कामगार नसतानाही (राजीनामा झाल्यानंतर) पतसंस्थेचे सभासद अथवा संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. माथाडी मंडळाचे नोंदीत कामगार नसताना राजीनामा झाल्यानंतर सबंधित व्यक्तीचे संस्थेतील सभासदत्व रद्द होणे क्रमप्राप्त असताना पैशाच्या हव्यासापोटी संस्थेचे चेअरमन पांडुरंग बाबूराव कदम यांनी सभासदत्व रद्द केले नाही. गेल्या काही महिन्यापासुन-वर्षापासुन माथाडी मंडळाचे सभासद नसतानाही पतसंस्थेचा कारभार हा एकाधिकारपणे चेअरमन म्हणुन ते हाकत होते. हा प्रकार घटनाबाहय व सभासद, कामगार आणि पतसंस्थेची फसवणुक करणारा आहे, असेही पत्रात म्हटले आहे.

संस्थेच्या नावावर कोणतीही जमिन / मालमत्ता खरेदी करताना त्याला सहकार खात्याची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र संबंधीतानी चेअरमनपदाचा गैरवापर करत जमिन व्यवहार मालमत्ता खरेदी प्रक्रीयेतुन मिळणा-या पैशाच्या हव्यासापोटी रेडझोनबाधित जमिन खरेदी केली. प्रत्यक्षात रेडझोनमधील जमीन खरेदीला शासनाची कोणतीही परवानगी नसते, हे माहित असुनसुध्दा वैयक्तीक स्वार्थापोटी सभासदांचे आर्थिक नुकसान केले. वार्षिक सर्वसाधारण सभा या संस्थेच्या वार्षिक ताळेबंद माहिती सांगण्यासाठी घेण्यात येतात. परंतु, या सभांमध्ये उपस्थितांना अर्धवट माहिती देण्यात येते. इतर संचालकांना वेठीस धरून भल्यामोठ्या अनावश्यक खर्चांना मंजुरी दिली जाते.

संचालक मंडळावर बेकायदेशीरपणे नियमबाहय तज्ञ संचालक स्वीकृत करून घेतले जात आहेत. चेअरमन पांडुरंग कदम यांनी वैयक्तीक लाससापोटी स्वतःच्याच मुलाला बेकायदेशीरपणे संस्थेत व्यवस्थापक म्हणुन कामास ठेवुन आवाच्या सव्वा पगार दिला आहे. त्यामुळे सभासदांच्या पैशांचा अपहार होत आहे. संस्थेत नोकर भरती करताना कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता नोकर भरती केली जाते. माथाडी मंडळात नोंदीत कामगार नसताना संस्थेचे सभासद / संचालक / चेअरमन म्हणुन पदे भूषवून सभासदांची दिशाभुल आणि नियमबाहय पद्धतीने कामकाज करून सभासद व संस्थेचे आर्थिक नुकसान केले जात आहे, असेही म्हटले आहे.

कर्ज वाटप करताना चेअरमन मनमानी कारभार व हितसंबंध जपुन कर्जाचे वाटप करतात. सभासदांचे कर्ज मंजूर झाल्यावरही कर्जाची रक्कम देताना पैशाच्या लाभापोटी सभासदांच्या हातात महिनो-महिने रक्कम दिली जात नाही. त्यामुळे सभासदांना गरजेच्या वेळी कर्जपुरवठा केला जात नाही. केवळ मुजोरी करणा-या हितसंबंधातील सभासदांनाच वेळेत कर्ज पुरवठा केला जातो. सन २०१४ ला नविन संचालक मंडळ निवडणूक प्रक्रीयेने अस्तित्वात आले. २०१९ साली कारभाऱ्यांची मुदत संपली. कोवीड संसर्गजन्य परिस्थीतीमुळे निवडणुक / सभा / संमेलन यांना बंदी होती.

निर्बंध शिथिल झाल्यानंतर जिल्हयातील नामांकीत बँका / विकास सोसायटया / पतसंस्था यांच्या निवडणुका पार पडल्या. कार्यकाल संपुनसुध्दा निवडणूक प्रक्रियेला डावलून चेअरमनपदी पांडुरंग बाबुराव कदम व संचालक मंडळ अद्यापही कार्यरत आहे. पतसंस्थेच्या निवडणूक प्रक्रियेला जाणूनबुजून विलंब केला जात आहे. सभासदांकडून विचारणा केली असता सहकारातील बडे अधीकारी माझ्या ओळखीचे आहेत, अशी दमबाजी करून सभासदांना कोंडीत पकडले जात आहे. चेअरमन पांडुरंग कदम यांना कोणत्याही मार्गाने उत्पन्न नसताना पतसंस्थेच्या जोरावर कोटयावधी रूपयांची संपत्ती त्यांनी जमा केल्याचा आरोपही या सभासदांनी केला. चेअरमनवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच या गैरव्यवहाराची व घटनाबाहय कामकाजाची चौकशी करून आम्हा शेकडो कामगारांना न्याय मिळवून द्यावा, असे या निवेदनात सभासदांनी म्हटले आहे.

या निवेदनाची प्रत त्यांनी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्य मंत्री, सहकार आयुक्त / निबंधक, सहकारी राज्य संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग / सेन्ट्रल बिल्डिंग पुणे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर, साखर संकुल शिवाजीनगर पुणे यांनाही पाठविल्या आहेत.

दहा सभासदांचे आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे – पांडुरंग कदम

याबाबत बोलताना संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कदम म्हणाले, संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला आहे. निवडणूक घेण्यासाठी सहकार खात्याला दोनवेळा पत्र दिले आहे. आमची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पण, त्यांचा प्रतिसाद आला नाही. त्यांनी परवानगी दिल्यानंतर निवडणूक लागणार आहे. आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. एककल्ली कारभार नाही. सर्वानुमते निर्णय घेतले जातात. आरोप करणारे सभासद आतापर्यंत आमच्यासोबत होते. अंतर्गत राजकारण झाले आहे. त्यातून आरोप-प्रत्यारोप चालू झाले आहेत. जिथे सिद्ध करायचे तिथे सिद्ध केले जाईल. आरोप करणारेही गुंतणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.