Chinchwad News: महाप्रसादाने मोरया गोसावी महोत्सवाची उत्साहात सांगता

40 हजार भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ

एमपीसी न्यूज – चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या 460 व्या संजीवन समाधी महोत्सवाचा आज (शनिवारी) उत्साहात समारोप झाला. समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महाप्रसादाने महोत्सवाची सांगता झाली. सुमारे 40 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

चिंचवडगाव येथील देऊळमळा पटांगणावर 21 ते 25 डिसेंबर 2021 या दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये व्याख्यान, भजन, कीर्तन, सुगम संगीत, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, श्री मोरया गोसावी चरित्र पठण, सामुदायिक महाभिषेक, रक्तदान शिबिर, याग, श्रीसूक्तपठण, दंत आणि नेत्र चिकित्सा शिबिर, माफक दरात चष्मे वाटप अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. शुक्रवारी रात्री पुरस्कार वितरणानंतर आर्या आंबेकर आणि त्यांच्या सहकलाकारांचे सुगमसंगीत झाले.

मंदार महाराज देव, चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते आज (शनिवारी) पहाटे साडेचार वाजता श्री मोरया गोसावी संजीवन समाधीची महापूजा झाली. सकाळी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. अखिल भारतीय वारकरी संघाचे अध्यक्ष मच्छींद्र महाराज कुंभार यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसाद झाला. सुमारे 40 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री मोरया गोसावी समाधी मंदिर, श्री मंगलमूर्ती वाडा येथे रात्री धुपार्ती होऊन महोत्सवाची सांगता होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.