Chinchwad News : दाभोळकर, पानसरे हत्याकांड, फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज – नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे हत्याकांड तसेच बहुचर्चित फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव 30 नोव्हेंबर रोजी 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त संजय शिंदे यांनी सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांना निरोप दिला.

श्रीधर पांडुरंग जाधव सन 1988 साली महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले. मुंबई घाटकोपर येथील चिरागनगर पोलीस ठाण्यात त्यांनी आपल्या पोलीस दलातील सेवेचा प्रारंभ केला. नरेंद्र दाभोळकर हत्याकांड, गोविंद पानसरे हत्याकांड या प्रकरणांचा तपास जाधव यांच्याकडे होता. तसेच फरासखाना पोलीस ठाणे येथे झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. गुंड गजा मारणे याच्यावर कारवाई करण्यास भलेभले पोलीस अधिकारी धजत नव्हते. मात्र जाधव यांनी गजा मारणेवर कारवाई तर केलीच पण त्याची तब्बल नऊ किलोमीटर धिंड काढली. बिरु बापू वाटेगावकर, बाप्प्या नायर असे बहुचर्चित प्रकरणांमध्ये देखील जाधव यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

34 वर्षांच्या सेवेच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये त्यांना 300 पेक्षा अधिक बक्षिसे मिळाली आहेत. श्रीधर जाधव यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह / बोध चिन्ह देखील मिळाले आहे. निवृत्तीच्या वेळी ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.

सोमनाथ रघुनाथ अडसुळ (प्रमुख लिपीक, आस्थापना शाखा), सहाय्यक पोलीस फौजदार दिलीप जनार्धन गायकवाड (नेमणूक तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन), सहाय्यक पोलीस फौजदार रियाज अहमद आदम पटेल (नेमणूक पिंपरी पोलीस स्टेशन) हे नियत वयोमानानुसार पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले.

सोमनाथ रघुनाथ अडसुळ प्रमुख लिपीक आस्थापना शाखा, पिंपरी-चिंचवड हे सन 1990 साली पोलीस दलात लिपीक पदावर भरती झाले असून त्यांना 31 वर्षाचे संपूर्ण सेवा काळात पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज दौंड, पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा तसेच मोटार परिवहन विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड येथे उत्कृष्ठ कर्तव्य बजावल्या बद्दल वरिष्ठांकडून एकूण 58 बक्षिसे व 16 प्रशस्तीपत्रके मिळाली आहेत.

दिलीप जनार्धन गायकवाड, सहाय्यक पोलीस फौजदार नेमणुक, तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन पिंपरी-चिंचवड हे सन 1983 साली पोलीस दलात भरती झाले असून त्यांचे 38 वर्षांचे संपूर्ण सेवा काळात पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड येथे उत्कृष्ट कर्तव्य बजावले बद्दल वरिष्ठांकडून एकूण 35 बक्षिसे मिळाले आहेत. रियाज अहमद आदम पटेल, सहाय्यक पोलीस फौजदार नेमणूक पिंपरी पोलीस स्टेशन हे सन 1985 साली पोलीस दलात भरती झाले असून त्यांचे 36 वर्षांचे संपूर्ण सेवा काळात पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथे उत्कृष्ठ कर्तव्य बजावले बद्दल वरिष्ठांकडून एकूण 50 बक्षिसे मिळाले आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.