Sangvi News : बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतली 70 हजारांची लाच; महिला उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – तक्रार अर्जावरून बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक महिलेने एक लाख रुपयांची लाच मागितली. तडजोड करून 70 हजार रुपये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाद्वारे स्वीकारले. एसीबीने सापळा लावून याप्रकरणी कारवाई केली. लाच घेतल्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या अधिका-यांना धक्का देऊन पळाला. तर महिला पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीने ताब्यात घेतले आहे.

महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा सिध्दराम सोळुंके यांना ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्‍ण देसाई एसीबीच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन पळून गेला आहे. याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात अर्ज आला आहे. त्या अर्जाची चौकशी उपनिरीक्षक सोळुंके यांच्याकडे आहे. अर्जावरून बलात्काराचा गुन्हा न दाखल करण्यासाठी उपनिरीक्षक हेमा सोळुंके यांनी तक्रारदारकडे एक लाख रुपये लाच मागितली. त्यानंतर तडजोड करून 70 हजार रुपये देण्याचे ठरले.

याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी पडताळणी केली आणि 2 डिसेंबर रोजी सापळा लावला. सोळुंके यांनी सहाय्यक उपनिरीक्षक देसाई यांना लाच घेण्यास पाठवले. लाच घेतल्यानंतर एसीबीचे अधिकारी देसाई यांनी पकडण्यासाठी गेले असता देसाई एसीबीच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन त्याच्या दुचाकीवरून पळून गेला. एसीबीने उपनिरीक्षक सोळुंके यांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक, पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, सहाय्यक पोलीस फौजदार शेख, पोलीस कर्मचारी नवनाथ वाळके, वैभव गिरीगोसावी, पूजा पागिरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.