Chinchwad : घराच्या उघड्या दरवाजावाटे 35 हजारांच्या वायरची चोरी

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चोरट्याने 35 हजार रुपये किमतीची पॉलीकॅप आणि इतर वायर चोरून नेली. ही घटना 23 एप्रिल रोजी दुपारी चारच्या सुमारास मोहननगर, चिंचवड येथे उघडकीस आली.

सारिका हरिचंद्र चव्हाण (वय 29, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर धोंडीबा जाधव उर्फ सोन्या (रा. शरदनगर, चिखली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 21 एप्रिल दुपारी पाच वाजल्यापासून 23 एप्रिल रोजी दुपारी चार वाजेपर्यंत घडली. फिर्यादी यांच्या घराचे डागडुजीचे काम सुरू आहे. त्यामध्ये नवीन दरवाजा आणि वायरिंगचे काम देखील सुरू आहे. मागील काही दिवसांपासून हे काम बंद आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना घरात प्रवेश केला 35 हजार रुपये किमतीच्या वायर चोरून नेल्या.

23 एप्रिल रोजी फिर्यादी यांना त्यांच्या पतीकडून समजले की, आरोपी सोन्या हा त्यांच्या घराजवळ फिरत आहे. त्यामुळे फिर्यादी आणि त्यांचा भाऊ आरोपीकडे गेले असता आरोपी सोन्या फिर्यादी यांच्या घराच्या पार्किंगमध्ये थांबला होता. फिर्यादी यांना पाहताच सोन्याने पार्किंगमधून धूम ठोकली. यावरून सोन्याबाबत संशय बळावल्याने त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.