Pimpri News : स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराला आयुक्तही जबाबदार; नगरसेवकांचा महासभेत आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील कामात 100 टक्के भ्रष्टाचार आहे. 250 कोटी रुपयांच्या कामाला तांत्रिक मान्यता घेतली नाही. सल्लागार, अधिकारी यांनी मिळून हा भ्रष्टाचार केला आहे. त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली. या भ्रष्टाचारात राजकारणीही सहभागी आहेत. स्मार्ट सिटीचे सीईओ असलेले आयुक्त स्वच्छ, इनामदार आहेत. तर, आठ महिने सुनावनी का घेतली नाही? त्यामुळे स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराला आयुक्तही जबाबदार असल्याचा हल्लाबोल सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी केला. तसेच आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी टीका केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा आज (बुधवारी) पार पडली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचारावर सुमारे पाच तास चर्चा झाली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आणि वर्तणुकीवर टीका केली. आयुक्तांना महिलांविषयी आदर नाही, मलाच सर्व कळत, या अविर्भावात आयुक्त असतात, भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात, असे आरोप नगरसेवकांनी केले.

भाजप नगरसेविका सुजाता पलांडे यांनी शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला. शहरातील प्रत्येक प्रभागांत महिला पोलिस चौकी उभारावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर आयुक्तांनी उत्तर दिले. पण, आयुक्तांच्या उत्तरावर सर्व नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. महिला सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. मात्र, नगरसेविकेचे या बाबतचे निवेदन ऐकून घेण्याऐवजी आयुक्त करतो, पाहतो, असे बेजबादारपणाचे उत्तर देतात, हे अशोभनीय आहे, अशी टीका भाजपचे नगरसेवक ज्ञानेश्वर थोरात यांनी केली. मला आयुक्तांशी बोलताना, त्यांना फोन करताना भीती वाटते, शहरातील महिलांप्रमाणे मलाही तुरुंगात टाकतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले, महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला रस्त्याच्या खोदकामाची माहिती नाही, आपल्या प्रभागात नक्की कशासाठी खोदकाम केले आहे हे संबंधित नगरसेवकाला माहिती नाही. कोणालाही न सांगता, कोणतेही नियोजन न करता रस्ते खोदले जात आहेत. हा मोठा भ्रष्टाचार आहे.

भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले, स्मार्ट सिटीत दिवसाढवळ्या, राजरोसपणे पैशावर दरोडा टाकला जात आहे. प्रभागातील कामे अडविली जातात. शरद पवार साहेबांनी भाजपच्या आमदारावर टीका करताना या आमदारांनी दुकान नव्हे तर मॉलच थाटल्याचा आरोप केला होता. या मॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही तीन ते चार दुकाने आहेत. असे सांगत याकडे सभेला हजर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे लक्ष्य वेधले.

भाजप नगरसेविका सीमा सावळे यांनी स्मार्ट सिटीचा भ्रष्टाचार, आयुक्तांनी घेतलेली सुनावणी, केलेली कारवाई, या बाबत प्रश्न विचारत आयुक्तांवर हल्लाबोल केला. स्मार्ट सिटीमध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारात राजकारणी आणि अधिकारीही सहभागी आहेत. शहरातील 500 किलोमीटर रस्त्याचे खोदकाम 750 किलोमीटर दाखविण्यात आले आहे. एल अँड टी कंपनीच्या 250 कोटीच्या कामाला तांत्रिक मान्यताच घेतली गेली नाही. स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार एवढा स्पष्ट दिसत असताना, आयुक्त सुनावणी देत नव्हते. सुनावणीत मांडलेले मुद्दे आयुक्तांना पटले, मात्र ते त्यावर ठाम राहिले नाही. आयुक्त ऐकून घेत नाहीत म्हणून अडचणी निर्माण होतात. प्रत्येक गोष्ट मलाच कळते, मीच भारी, मी करतो, मी पाहतो असे म्हणून चालत नाही. आपण किती घमेंड करावी.

आम्ही चोऱ्या करत नाही, सेटलमेंट करत नाही, आम्ही तुमच्याकडे कोणती कामे घेऊन येत नाही, आम्ही भ्रष्टाचारावर बोलतो. तुम्ही प्रामाणिक अधिकरी आहात, गरिबीतून वर आला आहात, ताई मी कलेक्टर व्हायनू, हे पुस्तक तुम्ही लिहिले आहे, या पुस्तकाशी प्रामाणिक राहून या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची हिम्मत दाखवा. त्यांनतर भ्रष्ट राजकारण्यांवर कारवाई करा, अशी मागणी नगरसेविका साळवे यांनी केली.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, स्मार्ट सिटीत अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार चालू आहे. बाजारभावापेक्षा चढ्यादराने वस्तुंची खरेदी केली आहे. सगळा गोलमाल कारभार सुरू आहे. दरम्यान, स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या खुलाशावर नगरसेवकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे महापौर ढोरे यांनी उद्या आयुक्त दालनात बैठकीचे आयोजन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.