Pimpri News: औद्योगिक परिसरात वाढलेल्या चो-या रोखा, स्वयंघोषित माथाडी कामगार नेत्यांना आवरा

लघुउद्योग संघटनेची पोलिसांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील तळवडे, सोनवणेवस्ती, कुदळवाडी, चिखली, शांतीनगर, प्राधिकरण सेक्टर 7, 10 तसेच एमआयडीसी भोसरी, पिंपरी-चिंचवड या औद्योगिक परिसरात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लघुउद्योग हे माथाडी कामगार कायद्याच्या कक्षेत येत नसतानाही औद्योगिक परिसरात स्वयंघोषित अनाधिकृत माथाडी कामगार संघटना, त्यांचे कामगार कामावर ठेवण्यासाठी, प्रोटेक्शन मनी देण्यासाठी उद्योजकांना नाहक त्रास दिला जातोय त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी लघुउद्योजकांनी पोलिसांकडे केली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनच्या वतीने औद्योगिक परिसरातील विविध औद्योगिक संघटना व वाहतूक संघटना यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या बरोबर शनिवारी (दि.28) चर्चा सत्राचे आयोजन केले होते.

या चर्चा सत्रासाठी उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त सागर कवडे, भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील तसेच पिंपरी- चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक संजय सातव, विजय खळदकर, प्रमोद राणे, विनोद मित्तल, स्वीकृत संचालक सुनील शिंदे, माणिक पडवळ, अनिल कांकरिया, राजू देशपांडे, विजय भिलवडे, रमेश होले, सचिन पाटील उपस्थित होते.

संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी उद्योजकांना जाणवत असलेल्या विविध समस्या पोलीस आयुक्तांसमोर मांडल्या. औद्योगिक परिसरात चोऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरटे गटागटाने येऊन सुरक्षा रक्षकाला प्राणघातक हत्याराचा धाक दाखवून चोरी करतात. सुरक्षा रक्षक निशस्त्र असल्यामुळे प्रतिकार करू शकत नाही. पोलीस उद्योजकांनाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, सुरक्षारक्षक ठेवा असा सल्ला देतात. औद्योगिक परिसरातील बहुतांश उद्योजकांनी आपापल्या कंपनीमध्ये सीसीटीव्ही बसविलेले असून सुरक्षारक्षक देखील ठेवलेले आहेत. परंतु, ज्या कंपन्यांमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत. त्या कंपन्यांनी संबधित पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही फुटेज देऊन देखील अद्याप पर्यंत चोरांचा किवा चोरी झालेल्या मालाचा पोलिसांना तपास लागलेला नाही.

पोलीस दप्तरी औद्योगिक परिसरात चोऱ्या करणाऱ्या ज्या अट्टल गुन्हेगाराची नोंद आहे. त्यांच्यावर कायमस्वरूपी कडक प्रतिबंधात्मक कारवाई करावी. औद्योगिक परिसरात महिला कामगार वर्ग देखील कामाला आहे. या चोरांकडून महिला वर्गाची छेडछाड केली जाते. त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्याची चोरी केली जाते. या चोरट्यामुळे महिला कामगारांना ओव्हर टाईमला थांबवू शकत नाही. महिला देखील ज्यादा वेळ कामावर थांबत नाही. तसेच पुरुष कामगारांना अडवून त्यांच्याकडील रोकड, मोबाईल काढून घेतले जातात. त्यांना मारहाण केली जाते. त्यामुळे कामगारांच्या कामावर येण्याच्या व घरी जाण्याच्या वेळेत पोलीस पथकांनी गस्त घालण्याची व्यवस्था केली पाहिजे.

लघुउद्योग हे माथाडी कामगार कायद्याच्या कक्षेत येत नसतांनाही औद्योगिक परिसरात स्वयंघोषित अनाधिकृत माथाडी कामगार संघटना या त्यांचे कामगार कामावर ठेवा व प्रोटेक्शन मनी देण्यासाठी उद्योजकांना नाहक त्रास देत असतात. या सर्व प्रकारामुळे येथील उद्योग बंद अथवा स्थलांतरित करण्याच्या मनस्थितीत आहेत. कंपनीमध्ये चोरी व इतर त्रास होईल या भीतीने उद्योजक तक्रार करण्यास पुढे येत नाही. औद्योगिक परिसरातील चोरीला गेलेले भंगार हे त्या परिसरातील अनाधिकृत भंगार खरेदी करणाऱ्या दुकानातच विकले जाते. या अनाधिकृत भंगार खरेदी करणाऱ्या दुकानाचा शोध घेउन त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई करावी. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर होणाऱ्या चोऱ्यांना थोड्याफार प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल.

तळवडे व चिखली औद्योगिक परिसरात सकाळी व संध्याकाळी मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी सकाळी कंपन्या चालू होण्याच्या वेळेस व संध्याकाळी कंपन्या सुटण्याच्या वेळेस होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य ते पोलीस बळ उपलब्ध करून द्यावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे, अशा विविध मागण्या संघटनेच्या पदाधिका-यांनी केल्या. त्यावर बोलताना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले, ”संबधित पोलीस अधिकाऱ्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले जातील. उद्योजकांच्या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.