Pune News : शहाळे महोत्सवात 5 हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान

एमपीसी न्यूज : वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतक-यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात 5 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते. त्यापैकी एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. सोमवारी  वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्यावेळी गणेश जन्माची पूजा  व अभिषेक झाला. तसेच मंदिरामध्ये गणेशयाग देखील झाला. गाभा-यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती. पहाटे पं. सुरेश तळवळकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम पार पडला.

श्रीगणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो. या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णुंच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरुपात शंकर-पार्वती यांच्या घरी जन्म घेतात. दुर्मती राक्षसाने पृथ्वी-पाताळ-स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालविलेला असतो. त्याचा नित्पात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेश विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध करतात. त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा करतात.

वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद््भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो.  तसेच, दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.