Dapodi: दुर्घटना, पोलिसांकडून महापालिका अधिका-यांचा बचाव?

एमपीसी न्यूज – दापोडीतील दुर्घटनेत दोघांचा जीव गमावला तरी पोलिसांकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिका-यांची साधी चौकशी देखील केली नाही. केवळ महापालिकेचे संबंधित अधिकारी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. परंतु, दोन दिवस उलटून देखील कोण अधिकारी जबाबदार आहेत?, त्याची महापालिकेकडे चौकशी केली नाही. त्यामुळे पोलीस महापालिकेच्या अधिका-यांचा बचाव करत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.

दापोडीत महापालिकेच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू होते. काम करत असताना तीस फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या कामगारांना वाचविण्याच्या प्रयत्नात महापालिका अग्निशामक दलाचे जवान विशाल जाधव आणि ढिगाऱ्याखाली अडकल्याने नागेश जमादार या कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.1) दापोडी येथे घडली.

याप्रकरणी सब कंत्राटदार, सुपरवायझर, महापालिकेच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सब कंत्राटदार अशोक माणिकराव पिल्ले, सुनील रमेश शिंदे, सुपरवायझर धनंजय सुधारक सगट यांना अटक करण्यात आली आहे. परंतु, महापालिकेच्या संबंधित अधिका-यांवर दोन दिवस झाले. तरी, देखील कोणतीही कारवाई झाली नाही.

अमृत योजनेच्या कामावर महापालिकेचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता देखरेख ठेवत होते. पोलिसांनी केवळ महापालिकेच्या संबंधित अधिका-यांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत दोघांचा बळी गेला आहे. घटनेला दोन दिवस उलटले तरी पोलिसांनी महापालिकेकडे संबंधित अधिका-यांची चौकशी केली नाही. कोणत्या अधिका-यांकडे कामाची जबाबदारी होती. याची माहिती घेतली नाही. संबंधित अधिका-यांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलीस महापालिकेच्या अधिका-यांचा बचाव करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत बोलताना सह शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, ”कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी कनिष्ठ अभियंता, उपअभियंत्यावर होती. पोलिसांनी संबंधित अधिका-यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस महापालिकेकडे चौकशीसाठी आले नाहीत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.