Dehu : श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्यावतीने अखंड अन्नदान सेवा  

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी व जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवसाच्या ( Dehu ) निमित्ताने वसंतपंचमी बुधवार, 14  फेब्रुवारी पासून ‘अखंड हरीनाम सप्ताह, गाथा पारायण व कीर्तन महोत्सव’ मोठ्या भक्तीभावाने व उत्साहाच्या वातावरणात सुरु झाला आहे. या सोहळ्याची सांगता माघ शुद्ध द्वादशी बुधवार 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यानिमित्ताने ट्रस्टच्यावतीने अखंड अन्नदान सेवा दिली जात आहे.

जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे काम गतीने सुरु असून  मंदिराचे काम मोठ्या प्रमाणात आकार घेऊ लागल्याने माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘अखंड हरीनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवास’ भाविकांची देखील मोठी गर्दी होत आहे. आज पहाटेची काकडा आरती, अभिषेक, महापूजा संपन्न झाल्यानंतर गाथा पारायण झाले. सायंकाळी 4 ते 6 या कालावधीमध्ये हभप रविदास महाराज शिरसाठ यांचे सुमधुर वाणीतून कैवल्यमुर्ती संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनचरित्रावार तत्व चिंतनपर निरुपण झाले.

तुका भरवितसे उदार करे | देव जेविताती परमादरे || साक्षात पांडुरंगाला तुकोबारायांनी प्रसादाचा घास भरविला ती ही पवित्र भंडारा डोंगराची भूमी. येथे येणा-या लाखो भाविकांची प्रसादाची उत्तम अशी व्यवस्था श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व माघ शुद्ध दशमी समितीच्यावतीने करण्यात आली असून पश्चिम दिशेला मंदिराच्या मागील बाजूला ‘संत तुकाराम महाराज महा प्रसादालय’ असा भव्य मंडप उभारण्यात आला असून सकाळच्या न्याहरीपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत या मंडपात अखंडपणे अन्नदान सुरु आहे.

Kalewadi : मित्राच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार करून नागरिकाची आर्थिक फसवणूक

महेंद्र होनावळे व सहकारी यांजकडून महाप्रसाद तयार करण्यात येत असून मावळ, खेड, मुळशी या तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ मंडळी आपापल्या गावाच्या भाकरी डोंगरवर आणून देत आहेत. चाकण, शेल पिंपळगाव, मोशी, तळेगाव येथील भाजीपाला विक्रेत्यांकडून मोफत भाजीपाला व भंडारा डोंगर पंचक्रोशीतील दुध व्यवसायीकांकडून मोफत दुध उपलब्ध होत आहे. मराठवाडा विकास संघाचे  अरुण पवार यांच्यावतीने भाविकांच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी मोफत टॅन्कर देण्यात आला आहे.

मावळ तालुक्याच्या पश्चिम टोकाला असणा-या बोरीवली व खांडी गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळी परंपरेप्रमाणे महाप्रसाद वाटपाची सेवा करीत असून आळंदी येथील स्वकाम सेवा संघ हा परिसर स्वच्छ ठेवत आपली सेवा पुरवीत आहे. चिखली येथील नेवाळे मंडपचे मालक प्रदीप नेवाळे यांच्यावतीने अत्यंत अल्पदरात सालाबाद प्रमाणे याही वर्षी आकर्षक अशी मंडप व्यवस्था करण्यात आली आहे.

मंदिराच्या अलीकडेच 500 मी. अंतरावर भाविकांच्या दुचाकी व चार चाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था ट्रस्टच्यावतीने करण्यात आली असून तळेगाव एम.आय.डी.सी. नवलाख उंबरे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक तुंग व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला असून डोंगरावर   येणा-या भाविकांनी देखील पार्किंग बाबत पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी केले आहे.

रात्री 8 वा. आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य, हभप ज्ञानेश्वर माऊली कदम (मोठे माऊली) यांची जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या धन्य ते संसारी | दयावंत ते अंतरी || तेथे उपकारासाठी | आले देव ज्या वैकुंठी ||लटिके वचन | नाही देही उदासीन || मधुर वाणी ओठी | तुका म्हणे वाव पोटी || या अभंगावर कीर्तन सेवा संपन्न झाली. अनेक दृष्ठांत सांगत माऊली महाराजांनी संताच्या अवतार कार्याची महती निरुपणातून सांगत या पवित्र मंदिर निर्माण कार्याला प्रत्येक भाविकाने देणगी देऊन सहकार्य करावे असे आवाहन ( Dehu ) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.