Dehugaon : देहू संस्थान राज्य सरकारने ताब्यात घ्यावे – नाना काटे

एमपीसी न्यूज – हिंदू धर्माची स्फुरणकेंद्रे बनविण्यासाठी राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, ज्योतिबा, शिर्डी, पंढरपूर आदी धार्मिक देवस्थान राज्य सरकारकडे आहेत. याच धर्तीवर तीर्थ क्षेत्र देहू (Dehugaon)  येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थान संस्थान हेही राज्य सरकारने ताब्यात घ्यावे,  अशी मागणी पिंपरी – चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नाना काटे यांनी म्हटले आहे की, देहू नगरीमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला भाजप पदाधिकार्‍यांनी राजकीय रंग दिला. याला देहू संस्थान विश्वस्तांनी मुक संमती दिली. धार्मिक कार्यक्रम असताना राज्य सरकारचे प्रतिनिधी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भाषण करून दिले नाही. तसेच मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे व देहू संस्थांचे पदाधिकारी यांनी स्थानिक आमदार सुनील शेळके व मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना निमंत्रण दिले नाही.

Dilip Kumar : दिलीप कुमार यांना भारतरत्न मिळावा – सायरा बानो

 

देहू संस्थानचा कार्यक्रम होता की भाजपचा प्रचार मेळावा?

देहुतील (Dehugaon)  कार्यक्रमावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण होणे अपेक्षित असतानाही त्यांना भाषण करू दिले नाही. यावर प्रतिक्रीया देत असताना विश्वस्तांनी हा प्रोटोकॉल दिल्ली येथून आला असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र यांना स्थानिक नेतृत्वाचा प्रोटोकॉल समजला नाही का? आपल्या महाराष्ट्राचे सरकारमधील प्रतिनिधी व राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यापेक्षाही विरोधी पक्षनेत्याचे भाषण करण्यास सांगणे हा प्रोटोकॉल कुठून आला. पिंपरी-चिंचवडचा विकास करताना देहूनगरीला लागणाऱ्या सर्व सुविधा देण्यासाठी अजितदादांनी कधीही मागे पुढे पाहिले नाही. भाजपच्या माजी आमदारापासून पिंपरी-चिंचवडमधील आमदार पदाधिकारी, प्रवक्ते व राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा या कार्यक्रमामध्ये मोठा वावर होता. हा देहू संस्थानचा कार्यक्रम की भाजपचा प्रचार मेळावा हा प्रश्न उपस्थित वारकऱ्यांना पडला होता. पंतप्रधान हे देशाचे असतात याचाही विसर पडलेल्या भाजप नेत्यांची मनमानी वारकरी सांप्रदायाची मने दुखावणारी ठरल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे देहू संस्थान राज्य सरकारच्या अखत्यारीत घेऊन येथील विश्वस्तांना रांगेतून दर्शन घेण्यास लावून राज्यसरकारने प्रोटॉकल दाखवून द्यावा असेही काटे यांनी म्हटले आहे.

 

 

देहू संस्थांकडून पुण्यातील भूमिपुत्रावर अन्याय

काल झालेल्या धार्मिक कार्यक्रमात देहू संस्थानने राजकारण केले. कार्यक्रमाच्या स्टेजवरती ठराविक नेत्यांची उपस्थिती होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दोन नंबरचे स्थान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे होते. तसा प्रोटोकॉल दिल्ली मधून पंतप्रधान कार्यालयातून संस्थांना मिळाला होता. कार्यक्रम ठिकाणी स्वागत भाषण राज्याचे विरोधी पक्षनेते व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. या नंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले. यावेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगूनही कार्यक्रमात अजित पवार यांना भाषणासाठी बोलू दिले नाही. देहू संस्थांच्या वतीने संबंध नसतानाही नागपूरच्या आमदारांना भाषण करण्याचा मान दिला. मात्र पुण्यातील भूमिपुत्र असणाऱ्या उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना मात्र डावलल्याने भूमीपुत्रांचा अपमान झाला असल्याचेही काटे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.