RR vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सवर 8 गडी राखून  दमदार विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर राजस्थान रॉयल्सला (RR vs DC ) केवळ 160 धावांत रोखून त्या धावा 11 चेंडू आणि 8 गडी राखून पूर्ण करत दिल्लीने राजस्थान संघावर दणदणीत मात केली आहे. मिशेल मार्श, वॉर्नरची दमदार फलंदाजी ठरली विजयाची शिल्पकार.

प्ले ऑफच्या दाव्यासाठी अजूनही तळ्यात मळ्यात असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची लढाई आज राजस्थान रॉयल्स विरुध्द होती, ज्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि अगदी सुरुवातीलाच खतरनाक फॉर्मात असलेल्या जॉस बटलरला स्वस्तात बाद करुन चांगली सुरुवात पण केली.चेतन साकरियाने त्याला फक्त 7 धावा करुन दिल्ली संघाला चांगली सुरुवात करुन दिली.

यावेळी राजस्थान रॉयलची (RR vs DC ) धावसंख्या फक्त 11 होती, यानंतर मात्र यशस्वी जैस्वाल आणि रवी अश्विनने दुसऱ्या गड्यासाठी 43 धावांची भागीदारी करत बऱ्यापैकी डाव सावरला, पण यशस्वी जैस्वालही फक्त 19 धावा करुन मिशेल मार्शच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि राजस्थान संघाला दुसरा मोठा धक्का बसला. यानंतर  अश्विन आणि पडीकल जोडीने जबरदस्त फलंदाजी करत आलेल्या सर्व दडपणाला झुगारून लावले. याच दरम्यान रवी अश्विनने सुंदर फलंदाजी करत आपले वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केले.मात्र अर्धशतक पूर्ण होताच तो मिशेल मार्शच्याच गोलंदाजीवर बाद झाला.

त्याआधी त्याने पडीकल सोबत तिसऱ्या गड्यासाठी 53 धावांची चांगली भागीदारीही केली.त्याने 38 चेंडूत 4 चौकार आणि दोन षटकार मारत 50 धावा केल्या.यावेळी राजस्थान रॉयल्सच्या 14.1 षटकात 3 बाद 107 धावा झाल्या होत्या, यानंतर आला तो कर्णधार संजू सॅमसन.मात्र त्याला आज फारसे काही करता आले नाही, फक्त सहा धावा करुन तो नोर्जेच्या गोलंदाजीवर बाद होवून तंबूत परतला. आणि त्यानंतर थोड्याच वेळात रियान परागही.

त्यामुळे राजस्थान रॉयल्स बऱ्यापैकी अडचणीत आले होते. मात्र पडीकलने तळातल्या फलंदाजांच्या साथीने जोरदार प्रतिकार करत संघाला 146 पर्यंत आणुन ठेवले, तो 48 धावावर नोर्जेच्या गोलंदाजीवर बाद झाला,मात्र वँनडरसेनने शेवटी शेवटी आक्रमक फलंदाजी करत संघाला 160 धावांचा चांगला टप्पा गाठून दिला.त्याने नाबाद 12 धावा काढल्या.राजस्थानसाठी अश्विनने सर्वाधिक 50 धावा काढल्या.दिल्ली कडून साकरिया,नोर्जे आणि मार्शने प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले.

दिल्ली संघ (RR vs DC ) कागदावर कितीही मजबूत असला तरी या आयपीएल मध्ये त्यांच्या खेळात जराही सातत्य दिसले नाही, त्यामुळेच त्यांना अजूनही प्ले ऑफमध्ये खात्रीशीर प्रवेश केलाय हे सिद्ध करण्यात अपयश आलेले नाही,आज जर त्यांना विजय मिळाला तर. जर तरचे समीकरण कदाचित त्यांच्यासाठी आशा घेऊन येईलही अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती, त्यासाठी हवी होती चांगली सुरुवात. मात्र आजही त्यांना तशी चांगली सुरुवात देण्यात यश आले नाही.

श्रीकर भरत दिल्लीच्या डावाच्या पहिल्याच षटकातल्या दुसऱ्याच चेंडुवर बोल्टची शिकार झाला,त्यानंतर मात्र डेविड वॉर्नर आणि मिशेल मार्श ही मूळची ऑस्ट्रेलियन जोडी एकत्र आली आणि त्यांनी जोरदार प्रतिकार करायला सुरुवात केली, वॉर्नरच्या तुलनेत मार्श जास्तच आक्रमक खेळत होता.

बघताबघता या जोडीने अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली, ज्यात मार्शचा वाटा होता 39 धावांचा. त्याने हाच धडाका पुढेही चालू ठेवला आणि बघताबघता आपले आयपीएलमधले पहीले अर्धशतकही पूर्ण केले,जे 27 सामन्यानंतर आले. त्याने अतिशय आक्रमक अंदाजात हे अर्धशतक पूर्ण करताना केवळ 40 चेंडूत अर्धशतक पूर्ण करताना 2 चौकर आणि5 उत्तुंग षटकार मारले.

दुसऱ्या बाजूने वॉर्नरही त्याला चांगलीच साथ देत होता. त्यामुळेच या जोडीने शतकी भागीदारीही केवळ 81 चेंडूत पूर्ण केली,यातही मार्शचा वाटा होता 67 धावांचा.या जोडीच्या धडाक्याने विजय दिल्ली कॅपिटल्सच्या आवाक्यात दिसू लागला होता.अर्थात तो विजय अजूनही 56 पावले. आपले 56 धावांची गरज सांगत होता, ज्या करायच्या होत्या, 36 चेंडूत. अखेर 144 धावांची मोठी भागीदारी झाल्यानंतर मिशेल मार्श वैयक्तिक 89 धावा करुन चहलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पण तोपर्यंत त्याने दिल्लीच्या विजयाचा पाया रचला होताच.

आता फक्त विजयाची औपचारिकताच बाकी होती,ती वॉर्नर आणि पंतने सहज पूर्ण करत संघाला 8 गडी राखून मोठा विजय मिळवून दिला. वॉर्नर 52 तर पंत चार चेंडूत 13 धावा काढून नाबाद राहीला. दिल्ली संघाची या विजयाने पुढील सामन्यातही अशीच कामगिरी होत राहो अशी अपेक्षा करत असलेले त्यांचे चाहते आज नक्कीच खुश झाले असतील,राजस्थान मात्र अजूनही पहिल्या चार संघात विराजमान आहे.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स
6 बाद 160
आर अश्विन 50,पडीकल 48,जैस्वाल 19,वँनडरसेन नाबाद 12
नोर्जे 39/2,साकरिया 23/2,मार्श 25/2
पराभूत विरुद्ध

दिल्ली कॅपिटल्स
18.1 षटकात 2 बाद 161
मार्श 89,वॉर्नर नाबाद 52,पंत नाबाद 13
बोल्ट 32/1,चहल 43/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.