Dr. Anil Roy : ‘स्टेथोस्कोप’ घेऊन महापालिकेत आलो अन् झाडू घेऊन सेवानिवृत्त झालो तरीही…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय (Dr. Anil Roy) नियत वयोमानानुसार 31 जुलै 2022 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. आज शनिवार आणि उद्या रविवार सुट्टी असल्याने सेवानिवृत्तीनिमित्त महापालिकेतर्फे शुक्रवारीच त्यांचा सत्कार केला. ‘स्टेथोस्कोप’ घेऊन महापालिका सेवेत आलो अन् झाडू घेऊन सेवानिवृत्त होत असलो. तरीही, आपल्याला दु:ख नाही. शहराला अधिक स्वच्छ शहरामध्ये रूपांतरित करू शकलो. त्यामुळे झाडू घेऊन सेवानिवृत्त होत असल्याचा मला खेद वाटत नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, सप्टेंबर 1991 मध्ये मी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून महापालिका सेवेमध्ये रुजू झालो. त्यानंतर जिजामाता आणि आकुर्डी रुग्णालयात काम केले. मुख्य कार्यालयातील वैद्यकीय विभागात काम करण्यास 2008 मध्ये सुरुवात केली. जून 2013 मध्ये आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदावर माझी पदोन्नती झाली. वैद्यकीय विभागात कार्यरत असताना बोपखेल, किवळे, पुनावळे, म्हेत्रेवस्ती, तळवडे, कासारवाडी, दळवीनगर, दिघी येथे नवीन दवाखाने सुरू केले.

महापालिकेचे दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये Primary आणि Secondary वैद्यकीय सेवेचे बळकटीकरण, तसेच थेरगाव, आकुर्डी, अजमेरा (नेत्र रुग्णालय), चिंचवड (तालेरा), पिंपरी (जिजामाता) येथे नियोजित आणि नवीन रुग्णालये मंजूर करण्यात आली. या सर्व रुग्णालयांनी महापालिकेकरिता वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये 800 पेक्षा जास्त खाटा जोडल्या आहेत. वायसीएम रुग्णालयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट सुरू करण्यास मदत केली. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी धन्वंतरी योजना सुरू केली. नगरसेवकांसाठी 5 लाखांची वैद्यकीय विमा योजना सुरू केली. महापालिकेच्या सर्व पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका रहिवाशांसाठी मोफत उपचार पुरविण्यासाठी प्रस्तावित केले आणि मंजूर केले.

तत्कालीन राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आणि सध्या वायसीएम आणि रुबी ऐल केअर येथे ही योजना महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजना म्हणून संबोधण्यात येत आहे. या योजनमुळे शेकडो रुग्णांना विशेषत: हृदयरोगावर मोफत उपचार मिळण्यास मदत झाली. सीएसआर अंतर्गत वायसीएम रुग्णालय येथे अत्याधुनिक रक्तपेढी बांधली. फेब्रुवारी 2019 पर्यंत वैद्यकीय विभागाचा विभागप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर माझी आरोग्य विभागात बदली झाली.

Article : शांतीदूत ठरत आहेत आजारांचे प्रसारक; कबुतरांची वाढती संख्या धोक्याची

आरोग्य विभागात रुजू झाल्यानंतर गाढ झोपेत (Dr. Anil Roy) असलेल्या विभागाला जागे करण्याचे काम सुरू केले. पीसीएमसी हेल्थ अँड सॅनिटेशन सोल्युशन्स हा फेसबुक ग्रुप सुरू केला आहे. जेथे नागरिक तक्रारी मांडतील ज्याचे त्वरित निराकरण केले जाते. आज या पेजवर 10 हून अधिक सदस्य आहेत. एका वर्षात 5 ते 6 लाखांहून अधिक तक्रारी / अभिप्राय प्राप्त झालेले आहेत. या वर्षांमध्ये 52 व्या स्थानावरून ते 19 व्या स्थानापर्यंत स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मानांकन मिळाले. यंदा महापालिका स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या 5 क्रमांकामध्ये असेल. घरोघरी कलेक्शन टेंडर लागू केले. ज्यामुळे शहरातील जवळपास 100 टक्के कचरा उचलला गेला.

शहरात कचरा वेगळे करण्याचे प्रमाण आता 85 टक्क्यांच्यावर आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व कचऱ्याचे डबे काढून ते कचरामुक्त शहर बनवले. कोरोना महामारी दरम्यान वॉर रूम, प्रथम प्रतिसाद पथके, संपर्कांचा मागोवा घेणे, कोविड केअर सेंटर सुरू केले. मी ‘स्टेथोस्कोप’ घेऊन महापालिका सेवेत म्हणजेच वायसीएममध्ये गेलो आणि आता झाडू घेऊन सेवेतून बाहेर पडत असलो. तरीही मला त्याचे दु:ख नाही. आरोग्य विभागातील माझ्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात मी शहराला अधिक स्वच्छ शहरामध्ये रूपांतरित करू शकलो आहे. त्यामुळे झाडू घेऊन सेवानिवृत्त होत असल्याचा मला खेद वाटत नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.