Pune News: पुणे महापालिकेकडून कोरोना काळात चांगले काम : डॉ. भारती पवार यांच्याकडून कौतुकाची थाप

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेकडून कोरोना काळात चांगले काम झाले. टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंटचे कार्य केंद्र सरकारच्या मार्गदर्शन तत्वांनुसार योग्यपद्धतीने केले गेले. शिवाय आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर, जम्बो रुग्णालयाच्या माध्यमातून बेड्स उपलब्ध करताना ऑक्सिजन निर्मिती आणि साठवण प्रकल्प उभारले, असे सांगून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पुणे महापालिकेच्या कोरोना काळातील उपाययोजनांसाठी कौतुकाची थाप दिली.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी पुणे महापालिकेत कोरोना संसर्ग आणि उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक घेत सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर डॉ. पवार पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, भाजप शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते.

कोरोना काळातील कामाचे कौतुक करत डॉ. पवार पुढे म्हणाल्या, ‘खासगी रुग्णालयाची अतिरिक्त आलेली एकूण साडेसहा कोटींची अतिरिक्त बिले महापालिकेकडून कमी केली गेली. शिवाय कोरोनाबाधित रुग्णांना त्वरित बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. महत्त्वाचे म्हणजे पुणे महापालिकेच्या ८८ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यु झाला. त्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत किंवा कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपातत्त्वावर महापालिकेत नोकरी देण्यात येणार असल्याचा स्तुत्य निर्णय पालिकेने घेतला, हे अनुकरणीय आहे’.

‘संभावित तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे काम महापालिकेकडून योग्य पद्धतीने चालू आहे. नगरसेवकांच्या माध्यमातून लसीकरणाबाबत चालू असलेले जनजागृतीचे कार्य कौतुकास्पद आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत ४८ लाख लसीचे डोस देण्यात आलेत. कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी गहाळ न राहता महापालिका जनजागृती आणि लसीकरण प्रभावीपणे करत आहे. संभावित तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालरोग तज्ज्ञांच्या सहाय्याने लहान मुलांसाठी करता आवश्यक औषधोपचारांची सोय महानगरपालिकेने योग्य पद्धतीने केली आहे. पुणे महानगरपालिकेकडून अन्य नगरपालिकांनी प्रेरणा घेऊन काम करायला हवे आहे, असेही डॉ. पवार म्हणाल्या.

कौतुकाची थाप कामाचा उत्साह वाढवणारी : महापौर मोहोळ

थेट केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांकडून पुणे महापालिकेच्या प्रयत्नांची दखल घेणे हे नक्कीच आम्हा सर्वांच्या कामाचा उत्साह वाढवणारे आहे. पुणे महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी या संकटकाळात मेहनत तर केलीच शिवाय या सगळ्या प्रयत्नांना पुणेकरांची उत्तम साथ लाभली. म्हणूनच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या कौतुकात समस्त पुणेकरांचाही मोठा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेनंतर दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.