Prabha Atre : डॉ. प्रभा अत्रे यांचा रविवारी पुण्यात सांगीतिक सत्कार सोहळा

एमपीसी न्यूज – पंडित व्यंकटेशकुमार यांची शास्त्रीय गायन मैफल किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि त्यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि.11) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌ आणि स्वरावर्तन फाऊंडेशनच्या संचालिका, प्रसिद्ध गायिका आरती ठाकूर-कुंडलकर यांच्यातर्फे विशेष सांगीतिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सांगीतिक सत्कार सोहळा सायंकाळी पाच वाजता म. ए. सो. ऑडिटोरिअम, मयूर कॉलनी येथे होणार असल्याची माहिती किराणा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका आणि डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आरती ठाकूर-कुंडलकर, सुप्रसिद्ध संवादिनी वादक सुयोग कुंडलकर आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्त्रबुद्धे, म. ए. सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌च्या महाविद्यालय सल्लागार समितीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ. अत्रे यांचा पुण्यात होणारा हा पहिलाच सांगीतिक सत्कार सोहळा असून डॉ. अत्रे यांच्यासह पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार या पद्म पुरस्काराने सन्मानित महनीय कलाकारांची एकाच स्वरमंचावर उपस्थिती हा सुवर्णयोग जुळून येणार आहे.

स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचा सत्कार विख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया आणि पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

सत्कार सोहळ्यानंतर किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल होणार आहे. प्रसिद्ध तबलावादक भरत कामत आणि सुप्रसिद्ध संवादिनी वादक सुयोग कुंडलकर त्यांना साथसंगत करणार आहेत. सत्कार सोहळा आणि शास्त्रीय गायनाची मैफल पुणेकर रसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला राहणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.