Pune News : 40 हजाराची लाच घेताना अभियंता रंगेहाथ जाळ्यात

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या शाखा अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 40 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. एक आश्रम शाळेत नळाचे कनेक्शन देण्यासाठी त्याने चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती.  पुण्यातील स्वारगेट परिसरात ही कारवाई करण्यात आली. 

विजयकुमार रामचंद्र मराठे (वय 52) असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. स्वारगेट पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रश्नी मिळालेली माहिती अशी की यातील तक्रारदार यांची आश्रम शाळा आहे. या आश्रमशाळेत त्यांना नळाचे कनेक्शन घ्यायचे होते. यासाठी त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयात अर्ज केला होता. हे कनेक्शन देण्यासाठी विजयकुमार मराठे यांनी चाळीस हजार रुपये लाचेची मागणी फिर्यादीकडे केली होती. तक्रारदाराने ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण तक्रारीची पडताळणी केली. यामध्ये अभियंता मराठे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून चाळीस हजारांची लाच स्वीकारताना मराठे यांना रंगेहात पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.