Fire News : धोकादायकपणे सिलेंडरमधून गॅस चोरी करताना स्फोट; दोघेजण जखमी

एमपीसी न्यूज – धोकादायकपणे कमर्शियल गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी करताना गॅस लिकेज होऊन व्हेपरचा स्फोट झाला. त्यामध्ये दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज (बुधवारी, दि. 8) दुपारी पिंपळे गुरव येथे घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथे आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचे मुख्य केंद्र आणि रहाटणी उपकेंद्र असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाने घटनास्थळावरून एक पाच किलो आणि दुसरा 14 किलोचा गॅस सिलेंडर जप्त केला आहे.

पिंपळे गुरव येथे राजकृष्ण मंगल कार्यालयाच्या जवळ मोरया कॉलनी क्रमांक पाच येथे एका घरात जखमी दोघेजण मोठ्या गॅस सिलेंडर मधून लहान गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे, धोकादायकरित्या गॅस काढून त्याची चोरी करत होते. गॅस काढताना झालेल्या हलगर्जीपणामुळे गॅसच्या व्हेपरला आग लागली आणि भडका उडाला. या भडक्यामुळे घराच्या भिंती पडल्या आणि दोघेजण किरकोळ जखमी झाले.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन विभागाचे वाहन जाऊ शकले नाही. परिसरात रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे त्या मार्गावरून अग्निशमन विभागाचे वाहन जाऊ शकत नाही. सुमारे 800 मीटर लांब वाहन थांबवून जवानांना ही परिस्थिती हाताळावी लागली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.